BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

Summary

लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा हा  ऐतिहासिक क्षण; या महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगीत महाविद्यालयातून भारतीय, वैश्विक संगीत शिकता येणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई दि. २८ : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा […]

लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा हा  ऐतिहासिक क्षण; या महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संगीत महाविद्यालयातून भारतीय, वैश्विक संगीत शिकता येणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. २८ : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  आज रविंद्र नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन २०२० चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर सन २०२१ चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, मीनाताई खडीकर, पद्मश्री सोनू निगम, आदिनाथ मंगेशकर,  संगीतकार मयुरेश पै, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा, ज्येष्ठ गायक पंकज उधास, ज्येष्ठ गायक रूपकुमार राठोड, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय  यांच्यासह रसिक प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य हस्ते उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  लतादीदी आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर हृदयात घर करून आहे, मराठी मातीमध्ये जन्मलेले हे रत्न अवघ्या भारत देशाचे झाले. करोडो रसिकांच्या मनात त्या एक दंतकथा म्हणून राहिल्या होत्या त्यांचा स्वर कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही असे सांगून त्यांनी स्वरमाऊलीला अभिवादन केले. दिदींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे आज वितरण झाले. या पुरस्काराच्या जोडीनं यासाठी पावले टाकली, गेल्या मंत्रिमंडळ बैठकीतच आम्ही निर्णयही घेतला. या महाविद्यालयासाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात पु.ल.देशपांडे कला अकादमीची जागा उपलब्ध करून दिली असून ग्रंथालय संचालनालयाची कालिना येथील 7 हजार चौरस मीटर जागा कला संचालकांकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

आज दोन वर्षांचे पुरस्कार ज्यांना प्रदान केले जात आहेत, त्या ज्येष्ठ गायिका उषाताई, आणि ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसादजी ही दोन्ही नावं  नतमस्तक व्हावीत अशीच आहेत.  त्यांनी आपल्या नावानंच रसिकांच्या नावावर अधिराज्य गाजवलं आहे आणि अजूनही गाजवताहेत. या दोन्हीही महान कलाकारांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

उषाताईंनी केवळ हिंदी आणि मराठीच नाही; तर वेगवेगळ्या प्रांतांतल्या वेगवेगळ्या भाषांमधून गाणी गाऊन त्यांनी स्वत:ला तर जोडलेच पण खऱ्या अर्थानं ‘भारत  जोडो’ केला.  पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या बासरीचे सूर ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या हिंदुस्तानची ओळख आहे.त्यांच्या बासरीने देशाच्या सीमांच्या भिंती तोडण्याची शक्ती असून नित्य नवे शिकण्याचा त्यांचा संकल्प कौतुकास्पद असल्याचेही कौतुकोदगार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण हे वेगवेगळ्या कलांना आधार देणारे, प्रोत्साहन देणारे तितकेच भक्कम असावे असा सरकारचा प्रयत्न आहे. मान-सन्मान आणि कलावंताच्या मदतीसाठी सदैव सज्ज आणि सतर्क आहोतच आहोतच मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर पडावी. जगाने आपल्या महाराष्ट्राच्या कलावंतावर कौतुक, आदर-सन्मानाची पखरण करावी यासाठी आम्ही कुठंही मागे राहणार नाही, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *