‘उर्दू घर’च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ – पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 14:- उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. इथल्या लोकांनीही उर्दू भाषेला आपली भाषा मानून शिक्षण-संवेदनेसह प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. या ‘उर्दू घर’च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याचा मला अधिक आनंद आहे, अशा भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ‘उर्दू घर’ इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, माजी मंत्री नसीम खान, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुद अहेमद खान, अल्पसंख्याक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवर, ऊर्दू साहित्यिक, ऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती होती.
हे उर्दू घर कला, साहित्य आणि भाषिक विकासाच्या अंगाने इथल्या जनसामान्यासाठी, उर्दू भाषिकांसाठी महत्वाची भूमिका निभावेल या दूरदृष्टीतून निर्माण करण्यात आले आहे. व्यवस्थापन समितीने उर्दू व इतर भाषावरील अनेक वैविध्य असलेले व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम येथे कसे आयोजित करता येतील यांचे नियोजन केले पाहिजे. हे उर्दू घर कला, साहित्य यांचे माहेरघर झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन याचे रुपांतर शादीखाना किंवा अन्य कामासाठी होणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन नव्या पिढीच्या शिक्षणाला अधोरेखीत केले.
अल्पसंख्याक समाजात बदलत्या शैक्षणिक संदर्भानुसारही विचार करण्याची वेळ आली आहे. यादृष्टीने त्यांच्या स्वयं रोजगाराला चालना देणारे कौशल्य विकासाचे केंद्रही या ठिकाणी कसे आकारात येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. येथील अल्पसंख्याक समाजातील मुलांची संख्या लक्षात घेवून कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याची मागणी त्यांनी ना. नवाब मलिक यांच्याकडे केली.
अल्पसंख्याक विकास विभागाला किमान एक हजार कोटी रुपयांचा वार्षिक निधी असला पाहिजे यासाठी आम्ही मंत्रीमंडळ पातळीवर प्रयत्न करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन जिल्ह्यातील शादीखाना, कब्रस्तान व इतर उपक्रमासाठी तूर्तास जिल्हा वार्षिक योजनेतून जेवढे यथाशक्य होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. नांदेड येथे ईदगाह साठी असलेले मैदान कमी पडते. हे लक्षात घेता याचाही विकास करण्याचे मी असल्याचे सांगितले.
अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना व ‘उर्दू घर’ सारखे प्रकल्प हे पुढच्या पिढीसाठीही तितकेच महत्वाचे आहेत. ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या चांगल्या स्थितीत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासकीय पातळीवरुन यांची देखरेख जरी समितीमार्फत केली जाणार असली तरी इथे येणाऱ्या प्रत्येकाने या ‘उर्दू घर’ कडे आपल्या घराच्या जबाबदारीने पाहून त्यात सर्वतोपरी योगदान दिले पाहिजे असे आवाहनही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या उदघाटन पर भाषणात केले . उर्दू घरचे भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झाले ते तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी उर्दू घर ला दिलीपकुमार यांचे नाव देण्याबाबत केलेल्या मागणीला त्यांनी होकार देवून यासाठी एकमताने निर्णय घेवू असे स्पष्ट केले.
भाषेच्या आदानप्रदानाचे उर्दू घर प्रतिक ठरेल
– अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक
हिंदी आणि उर्दू भाषेकडे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून पाहिले जाते. ही भाषा इथल्या भागाची जुबान आहे, बोली आहे. उर्दू भाषा याच मातीत जन्माला आली. ज्या भाषेतून आपण शिकतो त्या भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून ‘उर्दू घर’ची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा दृष्टीकोन असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केले. उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या योगदानातून उर्दूच्या विकासासाठी प्रयत्नाची गरज आहे. आज नांदेड येथे सुरु झालेले ‘उर्दू घर’ हे केवळ उर्दू भाषेपुरते मर्यादीत नव्हे तर मराठीसह इतर भाषेच्या प्रसाराचे, एकामेकांच्या आदान-प्रदानातून भाषिक विकासाचे प्रतिक ठरेल असा विश्वास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे उर्दूतील शिक्षण, उर्दू भाषेची त्यांना असलेली आवड आणि अल्पसंख्याकापोटी त्यांनी जपलेली कटिबध्दता ही सर्वश्रुत आहे. आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त उर्दू घरचे उद्घाटन व्हावे हे काळानेही मंजूर केलेले आहे. वास्तविक यांचे उदघाटन मागच्या वर्षी मार्चमध्ये नियोजीत होते. कोरोना मुळे ते पुढे ढकलावे लागले. ज्यांनी उर्दू भाषेसाठी योगदान दिले अशा स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचा दिवस या वास्तूच्या उद्घाटनाला मिळाल्याचा मला विशेष आनंद असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्घाटन पर केलेल्या भाषणातील मागणीचा संदर्भ घेवून त्यांनी याठिकाणी समितीकडून जे प्रस्ताव येतील त्याबाबत सकारात्मक विचार करुन अल्पसंख्यांकासाठी कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याचा प्रयत्न करु असे स्पष्ट केले. अल्पसंख्याक समाजात गरीबीमूळे न शिकता येणारा वर्ग मोठा आहे. अशा वर्गातील शिक्षणासाठी मुले जर पुढे येत असतील तर त्यांचाही प्राधान्याने विचार करु, त्यांना शिकवू असे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक वर्गातील मुलांसाठी वसतीगृहाबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले.
मोठया कष्टातून आकारास आलेल्या या ‘उर्दू घर’ला अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी, उर्दू साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी, साहित्यीकांनी योगदान देण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्वक उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था अधिक नावारुपास येईल, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे हे ‘उर्दू घर’ असून याला दिलीपकुमार यांचे नाव देणे अधिक समर्पक ठरेल. त्यांचे नाव ‘उर्दू घर’ला देण्यात यावे अशी मागणी तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी करुन या केंद्रात ई-शिक्षण केंद्र आकारास कसे आणता येईल याबाबत समितीतर्फे प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले.