क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

उमरवाडा येथील आशा स्वयंसेविका निवड नियमबाह्य

Summary

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्त संकलन तुमसर:-         तालुक्यातील उमरवाडा येथे दिनांक १९ मे २०२३ रोजी आशा वर्कर पदाकरिता आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यात गावातील नागरिकांनी जवळपास २० फॉर्म भरले. आशा वर्कर […]

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्त संकलन तुमसर:-
        तालुक्यातील उमरवाडा येथे दिनांक १९ मे २०२३ रोजी आशा वर्कर पदाकरिता आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यात गावातील नागरिकांनी जवळपास २० फॉर्म भरले. आशा वर्कर पद भरती संदर्भातील नियम व अटीप्रमाणे निवड करताना पहिल्या तीन पैकी दिपाली भावेश घडले यांना ११ गुण प्राप्त झाले तर स्वाती प्रदीप लाडसे यांना ०८ गुण, प्रतिमा गणेश बनकर यांना ०७, असे गुण प्राप्त झाले. आशा वर्कर पद भरती करिता गुणानुक्रमाणे ग्रामसभेत निवड करण्यात यावी असा नियम आहे. परंतु ०६ जून २०२३ ला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गुणानुक्रमाने निवड न करता मतदान प्रक्रियेद्वारे निवड करण्यात येईल असे ग्रामपंचात सचिव भारतीय मुरकुटे यांनी सांगितले आणि सदर प्रक्रिया राबवणे सुरू केले. सभेतील काही लोकांनी आरोग्य विभागाद्वारे दिलेल्या गुणांची यादी तपासली असता त्यात प्रियंका गणेश बोरकर यांना सुद्धा ०७ गुण असल्याचे सांगितले आणि पहिल्या ३ मध्ये त्यांचे सुद्धा नाव घालण्यात आले. आशा वर्कर पदाकरिता ४ मधून निवड होईल असे त्यात जाहीर करण्यात आले
      ३ आणि ४ क्रमांक असलेल्या दोन महिलांना समान गुण प्राप्त झाले असता त्या दोघांपैकी निवड न करता दोघांनाही संधी देण्यात आली. तर सर्वात जास्त गुण प्राप्त असलेली दिपाली भावेश घडले यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे व सदर निवड प्रक्रियेत अनियमितता झाली असून नियमबाह्यरित्या झाल्याचा आरोप देखील दिपाली घडले यांनी केला आहे. या संदर्भात दिपाली घडले यांनी या चुकीच्या प्रक्रिया संदर्भात अर्जाद्वारे खंडविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सभापती पंचायत समिती तुमसर यांना या संदर्भात लेखी तक्रार दिली आहे.
दिनांक २५ जुलै २०२३ ला पुन्हा विशेष ग्रामसभा घेण्याचे नोटीस दिनांक २१ जुलै २०२३ ला करण्यात आले आणि दिनांक २२ जुलै २०२३ ला गावात नोटीस बोर्डावर लावण्यात आले. ग्रामसभेच्या नियमांना डावलून अवघ्या तीन दिवसातच सभा घेण्यात आली.
      सदर सभेत प्रक्रियेला नागरिकांनी विरोध केला असता त्यांना न जुमानता ही प्रक्रिया पुढे नेण्यात आली. त्यात सर्वाधिक ११ गुण प्राप्त असलेल्या दिपाली भावेश घडले यांचे प्रथम येऊन सुद्धा त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले.
दरम्यान संबंधित उमेदवाराने बेकायदेशीर प्रक्रिया विरोधात ग्रामपंचायत सचिवाला सांगितले तर सचिव मुरकुटे यांनी सभेत तुम्हाला आक्षेप घेता येणार नाही आणि मी या संदर्भात प्रोसिडिंग बुक वर सुद्धा काही नोंदवणार नाही, अशी तंबी दिली आणि ही निवड आज कोणत्याही परिस्थितीत घेणे आहे, असे सांगितले. दुसऱ्या क्रमांकावर असलेली स्वाती प्रदीप लाडसे हिचे नाव गैरहजर असल्याचे दाखवण्यात आले व तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रतिमा गणेश बनकर यांचे नाव घेऊन समर्थनावर हात वर करा, असे सांगण्यात आले व हात मोजता येत नाही, अशी अडचण सांगत सचिवाने आवाराची गेट बंद करायला लावून चौथ्या क्रमांकावर असलेल्या प्रियंका बोरकर या दोघात मतदान प्रक्रिया राबवली. त्यामुळे सदर निवड प्रक्रिया नियमबाह्य झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
       कोरम बुक वर एकूण ४०६ आणि मतदान प्रक्रिया ३६४ लोकांची नोंद झाली असता उर्वरित बेचाळीस लोकांची सहमती किंवा असहमती का घेण्यात आली नाही, असा घडले यांनी आरोप देखील केला.
       सदर उमरवाडा येथील आशा वर्कर पदाची बेकायदेशीर निवड प्रक्रिया रद्द करावी अन्यथा तुमसर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिपाली घडले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, खंडविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीतून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *