उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार स्वराज्य मॅगझिनच्या वतीने सुप्रशासन आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
Summary
मुंबई दि 15:- स्वराज्य मॅगझिनच्या वतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाँडेचेरीत ‘पाँडी लिट फेस्टिव्हल’मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री […]
मुंबई दि 15:- स्वराज्य मॅगझिनच्या वतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाँडेचेरीत ‘पाँडी लिट फेस्टिव्हल’मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वराज्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न विश्वनाथन आणि संपादकीय संचालक आर. जगन्नाथन यांच्या हस्ते स्वीकारला.
स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्काराची रक्कम दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असण्यामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अमूल्य योगदान आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेनुसारच आमची वाटचाल सुरू आहे. सुशासन हा एकप्रकारे प्राणवायूच असतो. तो असेल तर किंमत नसते आणि नसला तर अस्वस्थता वाढते. सुशासन हा प्रशासनाचा पाया आहे.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावते आहे, अशी भावना श्री फडणवीस यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेने गेल्या काळात अनेक क्रांतिकारी निर्णय आणि सुधारणांद्वारे राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल घडले असून श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प इतिहासात मैलाचा दगड ठरत आहेत.
जनतेशी सहजतेने जवळीक साधण्याचे कसब, ध्येयासक्त, प्रामाणिक, आधुनिक तंत्रज्ञानातील जाणकार यांसारख्या गुणांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे देशात ओळखले जातात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरव मानपत्रात करण्यात आला आहे.