उघड्यावर धान खरेदी होणार नाही यासाठी जिल्ह्यात गोडाऊनचे नियोजन करा – पालकमंत्री नवाब मलिक
Summary
धान खरेदी मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठवा जिल्हा कोविड मुक्तीच्या मार्गावर गोंदिया, दि.25 : धानाचे उत्पादन लक्षात घेता साठवणुकीसाठी गोदाम कमी पाडतात. त्यामुळे धानाचे नुकसान होते. भविष्यात उघड्यावर धान खरेदी होणार नाही यादृष्टीने वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गोदाम निर्मितीचा प्रस्ताव शासनाला […]
धान खरेदी मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठवा
जिल्हा कोविड मुक्तीच्या मार्गावर
गोंदिया, दि.25 : धानाचे उत्पादन लक्षात घेता साठवणुकीसाठी गोदाम कमी पाडतात. त्यामुळे धानाचे नुकसान होते. भविष्यात उघड्यावर धान खरेदी होणार नाही यादृष्टीने वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गोदाम निर्मितीचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री नवाब मलिक यांनी प्रशासनाला दिल्या.
25 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
धान उत्पादन व साठवणूक या बाबी परस्पर पूरक असून उत्पादन पूरक गोदाम असणे आवश्यक आहे. भविष्यात ही अडचण होऊ नये म्हणून आतापासूनच नियोजन करावे व तसा प्रस्ताव पाठवावा असे पालकमंत्री म्हणाले.
धान व मका खरेदीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली तर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण धान खरेदी होऊ शकते अशी माहिती यावेळी बैठकीत दिली असता, तातडीने प्रस्ताव पाठवावा असे निर्देश त्यांनी दिले. भरडाई बाबतीतही यावेळी आढावा घेण्यात आला.
वीज देयक प्रलंबित असल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला अथवा नोटीस आली अशा योजनांची देयक 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून तातडीने भरावी. याबाबत वीज विभागासोबत समन्वय साधून पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच पूर्ववत केला जाईल यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्ह्याला 300 कोटींचे पीक कर्ज उद्दिष्ट असून आतापर्यंत 108 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. राष्ट्रीयकृत बँकांचे उद्दिष्ट कमी असून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांमधील शासनाच्या ठेवी काढून घेण्याचा ईशारा पालकमंत्र्यांनी दिला.
यावर्षी 2 लाख हेक्टर खरिपाचे असून 10 हजार हेक्टरवर भाताच्या रोपवाटिका टाकण्यात आल्या आहेत. आता पाऊस सुरू झाला आहे. खत आणि बियाण्यांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोविड नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. आज गोंदिया जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट राज्यात सर्वात कमी आहे. केवळ 45 क्रियाशील रुग्ण असून त्यापैकी 8 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 7 रुग्ण ऑक्सिजनवर तर 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांची प्रसंशा केली. जिल्ह्यात 60 वर्षावरील 83 टक्के, 45 वर्षावरील 52 टक्के व 18 वर्षावरील 05 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालच 30 हजार डोज प्राप्त झाले असून यामुळे लसीकरणाला वेग प्राप्त होणार आहे असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत कोविडसह, धान खरेदी, पीक कर्ज, पीक विमा, कायदा व सुव्यवस्था, बोनस, सीसीटीव्ही यंत्रणा अद्यावत करणे आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लेखाधिकारी सुशिल जक्कुलवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी शलाका सुर्यवंशी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) पुजा पाटील व जिल्हा धान्य खरेदी अधिकारी लिना फडके यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.