आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
Summary
सोलापूर, दि. 5 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय […]
सोलापूर, दि. 5 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आषाढी वारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले उपस्थित होते.
श्री.शंभरकर यांनी आषाढी कालावधी, शासकीय महापूजा, वारकरी, पायी वारी याबाबत माहिती दिली.
आषाढी यात्रेचा कालावधी 11 ते 25 जुलै 2021 असा राहणार आहे. आषाढी यात्रा मंगळवार दि. 20 जुलै 2021 रोजी होणार आहे. याच दिवशी श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे 2.20 ते 3.30 पर्यंत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मानाच्या पालख्यांचा प्रवास आणि वारकरी संख्या
मानाच्या 10 पालख्यांना शासनाने वारी करण्यासाठी परवानगी दिली आहे. एका पालखी सोहळ्याला दोन एसटी बस असून प्रत्येक बसमध्ये 20 प्रमाणे 40 वारकरी निश्चित केले आहेत. 40 वारकऱ्यांची यादी संबंधित संस्थानाने स्थानिक पोलीस प्रशासनाला द्यावी. पालखी संस्थानाचे पास प्रत्येक वारकऱ्यांना द्यावेत. वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांची तिथीच्या लगतपूर्वी दोन दिवस कालावधीमध्ये आरटीपीसीआरद्वारे कोविड चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. चाचणीबाबतचे नियोजन संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासनाने करावे. नकारात्मक चाचणी अहवाल प्राप्त असलेल्या प्रतिनिधींनाच वारी सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.
प्रतिकात्मक पायी वारी सोहळा
मानाचे 10 पालखी सोहळे 19 जुलै 2021 रोजी वाखरी येथे पोहोचल्यानंतर मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मान केला जाणार आहे. पालखी सोहळे 19 जुलै 2021 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. वाखरी येथे सर्व संतांच्या भेटी झाल्यानंतर पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. पायी वारी सोहळा प्रतिकात्मक स्वरूपात पूर्ण करण्यासाठी वाखरीपासून विसावा मंदिर, इसबावीपर्यंत सर्व मानाच्या पालख्यांना तीन किलोमीटर पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
इसबावीपासून पुढे पायी वारीसाठी प्रत्येक पालखीतील दोन व्यक्ती अशा एकूण 20 वारकऱ्यांना परवानगी असणार आहे, उर्वरित वारकरी बसमधून पंढरपूरला जाणार आहेत. पायी वारी करणारे वारकरी सामाजिक अंतराचे पालन करून मार्गक्रमण करतील, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. या काळात पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि पालखी विश्वस्त सोहळे हे समन्वयाने काम करणार आहेत.
पंढरपूरसह आजूबाजूच्या गावात संचारबंदी
आषाढी वारीला दरवर्षी होणारी गर्दी आणि कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या गावात शनिवार दि. 17 जुलै 2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून रविवारी दि. 25 जुलै 2021 च्या सायंकाळी चार वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर, भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगावदुमाला, लक्ष्मीटा
खाजगी वाहतूक राहणार बंद
पंढरपूर एसटी महामंडळाच्या आगारातून सुरू असणारी सर्व प्रकारची वाहतूक आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व खाजगी वाहतूक सेवा 17 जुलै 2021 ते 25 जुलै 2021 पर्यंत बंद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
इतरांना चंद्रभागा स्नानास बंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीमध्ये वारकरी भाविकांची स्नानासाठी गर्दी होऊ नये, यासाठी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांशिवाय इतर भाविकांना दि. 18 जुलै 2021 ते 25 जुलै 2021 पर्यंत चंद्रभागा स्नानास बंदी घालण्यात आल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.
मानाचे पालखी सोहळे पंढरपूरहून 24 जुलै 2021 रोजी प्रयाण करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तीन हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त
पंढरपूर शहरात कायदा, सुव्यवस्था चोख राहण्यासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी दिली. या काळात त्रिस्तरीय बंदोबस्त राहणार आहे. मानाच्या पालख्यातील वारकऱ्यांव्यतिरिक्त इतर वारकऱ्यांना पंढरपुरात येता येणार नाही, यासाठी शहरात आणि तालुक्याच्या बाहेर नाकाबंदी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य व्यवस्था सज्ज
वारी कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी शहरात पाच ठिकाणी ओपीडीची सुविधा राहणार आहे. उपजिल्हा रूग्णालयात सहा आयसीयू बेड आणि 20 खाटांची सोय नगरपालिकेच्या दवाखान्यात करण्यात आली आहे. डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी सीएचओची सेवा घेण्यात येणार आहे. दोन रूग्णवाहिका, 108 च्या रूग्णवाहिका वारकऱ्यांच्या सेवेत राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढेले यांनी दिली.
दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना परवानगी
- श्री संत एकनाथ महाराज संस्थान,पैठण, जि. औरंगाबाद.
- श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान,त्र्यंबकेश्वर, जि.नाशि
क. - श्री संत चांगावटेश्वर देवस्थान,सासवड, जि. पुणे.
- श्री संत सोपानदेव महाराज संस्थान,सासवड, जि. पुणे.
- श्री संत मुक्ताबाई संस्थान,मुक्ताईनगर, जि. जळगाव.
- श्री विठ्ठल रूख्माई संस्थान,कौंडण्यपूर, जि. अमरावती.
- श्री संत तुकाराम महाराज संस्थान,देहू, जि. पुणे.
- श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,आळंदी,जि. पुणे.
- श्री संत नामदेव महाराज संस्थान,पंढरपूर.
श्री संत निळोबाराय संस्थान,पिंपळनेर, जि. अहमदनगर.