आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा” पुस्तकाचे प्रकाशन
नवी दिल्ली, 2: विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावर भारतीय प्रशासकीय अधिकारी आशुतोष सलील (महाराष्ट्र कॅडर) तसेच पत्रकार बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” पुस्तकाचे प्रकाशन आज महाराष्ट्र सदन येथे झाले.
यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे, माजी प्रशासकीय अधिकारी तसेच सध्या क्षमता निर्माण आयोग (Capacity Building Commission) चे सदस्य प्रवीण परदेशी, श्री सलील, श्रीमती माथुर यावेळी मंचावर उपस्थित होते. या उपस्थितांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे यांच्या विषयी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार विषयी उद्योजक निलेश कुलकर्णी यांनी त्यांना बोलतं केलं. पुस्तकाच्या संकल्पने विषयी श्री. सलील आणि श्रीमती माथुर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
महात्मा गांधीजींच्या मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या जगण्याचा धांडोळा “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” या पुस्तकाने घेतला आहे. प्रसिद्धी झोतात न येता या मान्यवरांनी समाजात बदल घडवून आणलेला आहे.
‘खरा भारत खेड्यात आहे आणि जर गरिबांची सेवा करायची असेल तर खेड्यात जाऊन काम करायला हवं.’ हा महात्मा गांधीजींचा संदेश अनुसरून त्यांनी त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवली असून समाजालाही त्याचा फायदा होतो हे या लोकांनी त्यांच्या जगण्यातून सिद्ध केले आहे.
डॉ. स्मिता आणि रविंद्र कोल्हे, पर्यावरणवादी बंडू धोत्रे, मोहन हिरालाल, मोहन आणि रेवाजी तोफा, अनिकेत आणि समिक्षा तसेच दिगांत आणि अनघा आमटे, मतिन भोसले, सतीश गोगुलवार आणि शुभदा देशपांडे, डॉ. आशिष आणि कविता सातव यांच्या एकूण कर्तुत्वावर आधारीत “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” हे पुस्तक आहे. हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेच्यातर्फे पुस्तक प्रकाशित झाले.