BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारले जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

मुंबई, दि. १२ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल धोरणांमुळे राज्य ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) साठी देशातच नव्हे तर आशिया खंडात अग्रगण्य ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावर्षी जाहीर करण्यात आलेले नवे […]

मुंबई, दि. १२ डिसेंबर २०२५ :
महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल धोरणांमुळे राज्य ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) साठी देशातच नव्हे तर आशिया खंडात अग्रगण्य ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावर्षी जाहीर करण्यात आलेले नवे GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या आणि कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई परिसरात ६ एकर जागेवर २० लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे भव्य भाडेतत्त्वावरील बांधकाम उभारण्याची घोषणा केली असून, या ठिकाणी एका बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन करण्यात येणार आहे. हा करार २० वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,
“या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीबाबत जागतिक पातळीवर विश्वास अधिक दृढ झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन स्थिर, सुरक्षित आणि सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन पूर्णतः कटिबद्ध आहे.”

१ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक; ३० हजारांहून अधिक रोजगार

हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यामध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच या माध्यमातून ३० हजारांहून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली, भागीदार बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

हरित उर्जेवर आधारित, शाश्वत प्रकल्प

या प्रकल्पासाठी १०० टक्के हरित उर्जेचा वापर करण्यात येणार असून, इमारत जागतिक दर्जाच्या शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे GCC हब म्हणूनचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ब्रुकफिल्डची महाराष्ट्रातील गुंतवणूक अधिक मजबूत

ब्रुकफिल्डने यापूर्वी २०२४ मध्ये पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. त्याच वर्षी कंपनीने MMRDA सोबत १२ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला. तसेच जून २०२५ मध्ये बांद्रा-कुर्ला संकुलात २.१ एकर जागा खरेदी करण्यात आली आहे.

ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी अंकुर गुप्ता म्हणाले,
“आशिया खंडातील कार्यालयीन विकास क्षेत्रासाठी नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही मुंबईत उभारत आहोत. मुंबईतील आमची एकूण गुंतवणूक आता ४ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. उच्च दर्जाची, आधुनिक आणि शाश्वत कार्यस्थळे उभारण्यासाठी ब्रुकफिल्ड कटिबद्ध आहे.”

मुंबईला जागतिक GCC केंद्र म्हणून नवी ओळख

ब्रुकफिल्ड ही भारतातील आघाडीची कार्यालयीन मालक व ऑपरेटर कंपनी असून, देशातील सात शहरांमध्ये सुमारे ५५ दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते. पवईतील प्रस्तावित प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, सामाजिक सुविधा आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला जागतिक पातळीवर GCC हब म्हणून नवी ओळख मिळणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

संकलन :- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *