आरोग्य सेवेला बळकटी, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्पः नाना पटोले शेतक-यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प
Summary
मुंबई महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना […]
मुंबई
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पाचे स्वागत करून पटोले म्हणाले की, कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झालेली असतानाही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पासांठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामुळे मागच्या सरकारच्या काळात ठप्प झालेली विकासाची प्रक्रिया सुरु होणार असून महाराष्ट्राची विकासपथावर वेगाने घोडदौड सुरु होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालये, नगर पंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७ हजार ५०० कोटी रूपये जाहीर केले आहेत. सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, अमरावती, परभणी येथे नविन वैद्यकीय माहविद्यालये उभारण्यात येणार आहेत.
कोरोना काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला हाथ देणा-या बाळीराजाला साथ देण्यासाठी तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीसाठी २ हजार कोटी, पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी ३७०० कोटी, विकेल ते पिकेल या योजनेसाठी २ हजार १०० कोटी, कृषीपंपाच्या जोडणीसाठी १५०० कोटी तर सिंचनासाठी जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटी, जलंसधारण प्रकल्पांसाठी २ हजार ६० कोटींची तरतूद केली असून गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ७ हजार ५०० कोटी, पुणे रिंगरोड, मुंबई गोवा किनारी मार्ग, पुणे नगर नाशिक रेल्वे मार्ग, ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासह मुंबईतील विकास प्रकल्पांसाठीही भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील, रस्ते, तिर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यासोबतच महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठीही प्रत्येकी दीडशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थीनी, गृहिणी, कष्टकरी महिलांसाठी राज्य सरकारनं नव्या योजना जाहीर केल्या आहेत. घराची नोंदणी महिलांच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहरातील महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणखी तेजस्विनी महिला बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलात राज्यातील पहिलीच स्वतंत्र महिला पोलीसांची तुकडी स्थापन करण्यात येणार आहे.
पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक “राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क”, राज्यातील युवकांसाठी कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना सुरू करण्यता येणार असून शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा 5 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून राज्याच्या प्रगतीचा वेगही वाढणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.