आरोग्य सुविधेबाबत औरंगाबाद जिल्ह्याने रोल मॉडेल म्हणून काम करावे – पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा घेतला आढावा
औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य सुविधेविषयीचे रोल मॉडेल म्हणून काम करावे, तसेच रोड मॉडेल म्हणून काम करत असताना ग्रामीण भागात सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज दिले.
जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांची आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, ऑक्सिजन प्लान्टची ऑक्सिजन निर्मितीक्षमता व लसीकरणासह उर्वरित विकासकामे यात शिक्षण, पाणी पुरवठा, रस्ते बांधकाम, निझामकालीन शाळांची दुरूस्ती, नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी कालबध्द व नियोजनपूर्ण पध्दतीने करावी असे निर्देश देत श्री.देसाई म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवण्याबरोबरच लहान मुलांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पोषण आहारासह उपचार यंत्रणा अद्ययावत यंत्रसामुग्रीसह सज्ज ठेवावी. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याने आरोग्य यंत्रणेसाठी रोल मॉडेल म्हणून सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ते प्रस्तावाचे नियोजन सादर करावे अशी सूचना बैठकीत बोलताना केली. याचबरोबर कोरोना कालावधी सुरू झाल्यापासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या जिल्ह्यातील महत्वाकांक्षी मिशन उभारी 2.0 या उपक्रमाविषयी आढावा घेऊन याबाबत जिल्हाधिकारी यांना सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना यावेळी केली.
ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहत क्षेत्रातील भूखंडावरील अतिक्रमण झालेली बांधकामे, थकीत पाणी वापराची देयके, कचऱ्याची विल्हेवाट, जिल्हा परिषदेच्या निझामकालीन शाळांची दुरूस्ती, बांधकाम तसेच अधिकारी-कर्मचारी निवासाच्या बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांना दिले.
या बैठकीच्या प्रास्ताविकात डॉ.मंगेश गोंदावले यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे पालकमंत्री यांचेसमोर सादर केला.