आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
Summary
मुंबई, दि. 1 :-राज्य शासनाच्या 75 हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब […]
मुंबई, दि. 1 :-राज्य शासनाच्या 75 हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले.
आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री डॉ. सावंत बोलत होते. बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सहसचिव विजय लहाने, टीसीएस कंपनीचे मयुर घुगे आदी उपस्थित होते.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागाची ही भरतीप्रक्रिया सर्वात मोठी आहे. त्यामुळे अत्यंत सुरक्षितपणे भरतीप्रक्रिया राबवावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मागील परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार या परीक्षेत व्हायला नको. परीक्षेसाठी 10 ते 11 लाख अर्ज येण्याचे लक्षात घेत सर्वरची क्षमता ठेवावी. सर्वर डाऊनमुळे अर्ज न स्वीकारणे, परीक्षा न देता येणे आदी प्रकार होऊ नयेत, यासाठी कंपनीने आत्ताच नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या.
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आत्तापासूनच निश्चित करावी, उमेदवारांना परीक्षा केद्रांवर येताना असलेले नियम प्रवेशपत्रावर नमूद करावे. असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले. बैठकीला विभागाचे व कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००