आरडाओरड केल्याने मिळाला बेड पण गमावला जीव
चंद्रपूर : चंद्रपुरातील कोविड रुग्णालयात रुग्णांची कशी हेळसांड होत आहे, याचा नमुना बघायला मिळाला. उपचाराभावी शेवटी एका महिला रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. इथल्या कोविड रुग्णालयात एक महिला काल दाखल झाली. कोरोनाबाधीत असल्याने तिची ऑक्सिजन पातळी खालावली होती. व्हील चेअरवर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिचे नातेवाईक ऑक्सीजनची आणि तातडीच्या उपचाराची मागणी करीत होते. पण उपस्थित डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी तिला साधे दाखलही करून घेतले नाही. आरडाओरड केल्यानंतर तासाभरानंतर तिला बेड मिळाला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. शेवटपर्यंत तिला ऑक्सीजन मिळू शकले नाही आणि तिचा मृत्यू झाला. शासकीय कोविड हॉस्पीटलमधील या अनागोंदीवर अनेकदा टीका झाली. लोकांनी असंतोष व्यक्त केला. इतकेच नाही, तर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पीटलवर दगडफेकसुद्धा केली आहे. पण तरीही यातून कोणतीही सुधारणा हॉस्पीटल व्यवस्थापन करीत नाही. अशा अनास्थेमुळेच लोकांचे जीव जात आहेत. काल झालेला या महिलेचा मृत्यू हा त्यापैकीच आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करावी आणि इतर रुग्णांचा तरी जीव वाचवावा, अशी मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
विक्की नगराळे
तालुका व शहर प्रतिनिधी
चंद्रपूर