आयुष नगर ग्रामस्थांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आयुष नगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासह त्यांचे पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचे बुधवारी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुष नगर येथील ग्रामस्थांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या निमित्ताने आयोजित शोकसभेत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “अजितदादा केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारे ‘हक्काचे भाऊ’ होते. त्यांनी दिलेला आधार व केलेली विकासकामे कायम स्मरणात राहतील,” अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, कर्तव्यदक्ष विमान कर्मचाऱ्यांचे अकाली जाणे ही समाजासाठी कधीही न भरून निघणारी हानी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या श्रद्धांजली सभेला आयुष नगरमधील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ॲड. मोटघरे, गिरीश शास्त्रक्कार, संजय डाखरे, प्रदीप चिताडे, सचिन येरेवार, उक्केकर, भास्करवार, वानखेडे, पेंदाम सर, तेलखडे सर, मानकर, रजत म्हस्के, वसंत येरेवार आणि विशाल नगराळे यांचा प्रामुख्याने समावेश होता.
महिलांच्या वतीने श्रीमती गीता वसंत येरेवार, श्रीमती दीक्षा रविंद्र मोटघरे, म्हस्के ताई, मानकर ताई, भांडवलकर ताई, कल्याणी वानखेडे, अश्विनी रायजादा, पायल मेश्राम, मंजुषा मेश्राम, संजुशा नगराळे, तसेच कु. आकृती व हिमांशी यांनी पुष्प अर्पण करून मृतांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.
या दुःखद घटनेमुळे संपूर्ण आयुष नगर परिसर शोकमग्न झाला असून, ग्रामस्थांनी दिवंगतांना अश्रुपूरित नयनांनी अखेरचा निरोप दिला.
