आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे कौतुक

विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात
सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना
मुंबई, दि. २८ : शहरीकरण व वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने हाती घेतलेला कमी जागेत जंगल निर्माण करण्याचा मियावाकी जंगल प्रकल्प स्तुत्य आहे. चेंबरने वृक्ष लागवडीचा हा उपक्रम राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील राबवावा व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण कार्यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पूर्वीची इंडियन मर्चंट चेंबर)च्या वतीने राजभवन येथे तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते तसेच प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीत कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, तसेच ‘राजभवन मियावाकी जंगल प्रकल्प’ या विषयावरील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या मियावाकी जंगल प्रकल्पांतर्गत राजभवनातील हिरवळीनजीक पश्चिम समुद्र किनाऱ्यावर सहा हजार चौरस फूट जागेवर ४८ प्रकारांच्या दोन हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे.
मियावाकी जंगल प्रकल्प आयएमसी शताब्दी ट्रस्ट अंतर्गत हाती घेण्यात आला असून ‘केशव सृष्टी’ द्वारे त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
यावेळी राज्यपालांनी आयएमसीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच झाडांची लागवड व बागकाम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.
राजभवन येथे लावण्यात आलेल्या रोपांमध्ये अडुळसा, अनंत, अंजीर, आवळा, बेल, बोर, चंदन , दालचिनी, कढीपत्ता, काजू, कन्हेर, करवंद, खजूर, मोगरा आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या समारंभाला आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपाध्यक्ष सुनिता रामनाथकर, इंडियन मर्चंट्स चेंबरच्या शताब्दी समितीचे अध्यक्ष राम गांधी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ति, आयएमसीचे माजी अध्यक्ष आशिष वैद, नीरज बजाज, शैलेश वैद्य आणि अनंत सिंघानिया, आयएमसी महिला शाखेच्या उपाध्यक्षा राजलक्ष्मी राव, कॅन्को ॲडव्हर्टायझिंगचे व्यवस्थापकीय संचालक रमेश नारायण, आयएमसी यंग लीडर्स फोरमचे सह-अध्यक्ष अतीत संघवी, ज्योत्सना संघवी, राजेश चौधरी, महासंचालक अजित मंगरूळकर, उपमहासंचालक संजय मेहता आणि शीतल कालरो आदी उपस्थित होते.
0000