महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज – माजी लोकायुक्त एम. एल. टहलियानी राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान प्रदर्शनाचे मुंबईत आयोजन

Summary

मुंबई, दि २८: आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्याचे माजी लोकायुक्त […]

मुंबई, दि २८: आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्याचे माजी लोकायुक्त एम. एल.टहलियानी यांनी केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त न्याय सहाय्यक संस्थेच्यावतीने वार्षिक राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान प्रदर्शनाचे (नॅशनल फॉरेन्सिक एक्सपो- २०२३) मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, न्याय सहाय्यक भौतिकशास्त्र विभागप्रमुख ना. मा. फटागरे, डॉ होमी भाभा विद्यापीठाचे अविनाश दलाल, माजी आमदार अतुल शाह यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

माजी लोकायुक्त श्री. टहलियानी म्हणाले की, पुढील काळात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञानाला खूप महत्व असणार आहे. गुन्हेगार आपला पुरावा मागे राहू नये यासाठी प्रयत्न करत असतो. पुरावे नष्ट करण्यासाठी तो प्रयत्नशील  असतो. अशा प्रकारचे गुन्हेगार शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप गरजेचे आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञान उपयोगी पडेल आणि अनेक प्रकरणांचा उलगडा होईल. न्यायवैद्यक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून अहवाल देताना स्पष्टता आणि पारदर्शक दिला पाहिजे. २६/११ च्या दहशतवादी हल्ला प्रकरणांमध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने फायदा झाला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

न्यायवैद्यक तंत्रज्ञानाची न्यायदानात महत्वाची भूमिका – कुलगुरू डॉ. रजनीश कामत

राष्ट्रीय विज्ञान दिवस हा महत्वाचा दिवस असून या दिवसाची यावर्षीची संकल्पना ‘वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान’ (ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिइग) अशी आहे. न्याय व्यवस्थेत न्यायवैद्यक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आज सायबर गुन्हेगारीत वाढ होतांना दिसत आहे, असे गुन्हे घडू नयेत म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. आज बरेच लोक तंत्रज्ञानचा वापर करत आहेत. निर्भया प्रकरणामध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाच्या वापरमुळे फायदा झाला. तंत्रज्ञान वापरण्याबाबत नागरिकांना जागरूक केले पाहिजे, असे कुलगुरु डॉ.कामत यांनी सांगितले.

गुन्हे स्थळ दृश्य पुनर्रचना, छाप पुरावे, रक्त नमुना विश्लेषण, आपत्ती प्रकरणातील व्यक्तींची ओळख, मृत्यू वेळेचा अंदाज, वैज्ञानिक तंत्र, फसवणुकीचा शोध, शोध आणि विश्लेषण, विष आणि औषधे, पेंट आणि काचेचे विश्लेषण, प्रयोगशाळा प्रणाली आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

सायबर विभागाकडून २० मिनिटांचा ऑनलाईन शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम याठिकाणी ठेवण्यात आला आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *