महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सोय; आश्रमशाळा आणि विद्यापीठ परिसरात उभारणी -मंत्री डॉ. अशोक उईके

Summary

मुंबई, दि. १६ : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना निवासाची अडचण भासू नये, यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. वसतिगृहाची गरज आहे त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये तसेच विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारण्यात येणार असल्याचे […]

मुंबई, दि. १६ : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना निवासाची अडचण भासू नये, यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. वसतिगृहाची गरज आहे त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये तसेच विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. वसतिगृहांच्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मंत्री डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विभागांतर्गत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी चंद्रशेखर वझे, प्रणव गोंदे, दूरदृष्यप्रणालीद्वारे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्यातील विद्यापींठात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. वनधन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींच्या वनौपज खरेदी व विपणन व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांची चरित्रे उपलब्ध करून देण्याबाबत तसेच वनहक्क समिती सदस्यांच्या नियमित आणि नियोजित प्रशिक्षण याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील वनहक्क समितीबाबत आढावा घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी समाजातील कोलाम, पारधी, कातकरी, माडिया, गोंड समाजाच्या विकासाकरिता विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमामुळे या समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.

जात पडताळणीची प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा वाढवणे, कौशल्य व आर्थिक विकासाच्या योजना याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *