आंबेडकरी चळवळीचे कृतीशील भाष्यकार काळाच्या पडद्याआड!
Summary
पुणे येथील सुगावा प्रकाशनाचे संस्थापक, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह चळवळीचे अग्रणी, वंचित व दुर्लक्षित समाज घटकांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास वाघ यांचं आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे पुण्यात दुःखद निधन झालं. सुगावा प्रकाशन म्हणजे आंबेडकरी चळवळीचा प्रपंचच होता.!चळवळीचे […]
पुणे येथील सुगावा प्रकाशनाचे संस्थापक, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह चळवळीचे अग्रणी, वंचित व दुर्लक्षित समाज घटकांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास वाघ यांचं आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे पुण्यात दुःखद निधन झालं. सुगावा प्रकाशन म्हणजे आंबेडकरी चळवळीचा प्रपंचच होता.!चळवळीचे प्रबोधन आणि आत्मटीकेचे ते एक साधन होते प्रबोधनाचे, विचारांचे धर्मचिकित्सेचे, लेखक आणि सजग वाचक घडविण्याचे क्रांतीकारी पर्व म्हणजे सुगावा!
आंबेडकरी विचार सर्वदूर पोहचविण्याचे महत्त्वाचं काम करणाऱ्या सुगावा प्रकाशना बरोबरच विलास वाघ यांनी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली होती. देवदासींची घरं आणि रेड लाईट भागातल्या वेश्यांच्या घरांचे उंबरठे झिजवत विलास आणि उषा वाघ यांनी त्यांच्या मुलांना शाळेत दाखल केले. गुन्हेगारी जगापासून लांब ठेवले आणि त्यांच्यातला माणूस जागा करत त्यांचे ते मायबाप झाले. भटक्यांसाठी आश्रम शाळा, सिद्धार्थ बँक किंवा सामुदायिक शेतीचा प्रयोग या सगळ्या गोष्टी त्यांनी परिवर्तनाशी जोडल्या. जातिनिर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन असं विविधांगी काम त्यांनी उभं केलं होतं. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘प्रबोधन पर्व’ हा प्रा. विलास वाघ गौरव ग्रंथ प्रकाशित झाला होता. हा ग्रंथ वाचून त्या उभयतांच्या अफाट कामाची ओळख झाली आणि त्यांच्या कामाला सलाम करावासा वाटतो. त्यातून उषा वाघ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक लेख लिहिले. उषा आणि सुगावा परिवारातील सगळ्या आप्तेष्टांना हे डोंगराएवढं दुःख पेलण्याची ताकद मिळो ही सदिच्छा सर्व स्तरावर व्यक्त केली आहे.
सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. ‘मिळून साऱ्याजणी’शी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या पत्नी आणि चळवळीतल्या त्यांच्या साथीदार उषा वाघ यांच्यावर उर्मिला पवार यांनी लिहिलेला लेख ‘मिळून साऱ्याजणी’च्या फेब्रुवारी २०२१ च्या अंकात प्रकाशित झाला होता. विलास वाघ यांच्या समर्पित जीवनाला ‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘पुरुष उवाच’ परिवारातर्फे आदरपूर्वक श्रद्धांजली!
गडचिरोली
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम