आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राचा प्रस्ताव सादर करा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
Summary
मुंबई, दि. 5 : औरंगाबाद जिल्ह्यातील अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जमीन व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले. सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे […]
मुंबई, दि. 5 : औरंगाबाद जिल्ह्यातील अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जमीन व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले.
सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दि.रा.डिंगळे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या एम.आर.पिंपरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या माध्यमातून बौद्धकालिन चित्रांचे जतन करणे गरजेचे आहे. अंजिठा-वेरुळ या पर्यटनस्थळाला आंतरराष्ट्रीय पर्यटक भेटी देत असतात. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र विकसित करण्यासाठी अंजिठा-वेरुळ परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या उपलब्ध जागेचा विचार करता येईल.या प्रकल्पासाठी जागेची निश्चिती करुन तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्रीमती एम.आर.पिंपरे यांनी केंद्रातील कामांबाबत सादरीकरण केले तसेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट, जागा आणि अंदाजित खर्चाची माहिती दिली.