अवकाळी पावसाचा संत्रा पिकाला फटका; फळांची मोठी गळ
Summary
कोंढाळी :प्रतिनिधी- राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटोल तालुक्यात अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. सध्या मृग बहारातील […]

कोंढाळी :प्रतिनिधी-
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटोल तालुक्यात अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे.
सध्या मृग बहारातील संत्रा बाग शेतात आहे. संत्रा परिपक्व झाला असून माल बाजारपेठेत जात आहे. तर बहुतांश शेतकऱ्यांनी संत्र्याची तोडणी केलेली नाही. दरम्यान मंगळवारी काटोल तालुक्यात सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू होता. त्यात वादळी वारा झाला. त्यामुळे झाडावरील संत्र्याची मोठी गळ झाली. तसेच संत्र्याचा दर्जा देखील खालावला आहे. शेतात संत्र्याचा सडा पडला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
काटोल तालुक्यातील चंदनपारडी,कचारीसावंगा, मेढेंपठार, रिधोरा, पंचधार या परिसरातील शेतकऱ्यांचा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. संत्रा उत्पादक शेतकऱ्याला मागील वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही. त्यात कापसालाही भाव नाही. त्यामुळे शेतकरी कात्रीत अडकला आहे.
०७मार्च ला अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या संत्रा बागायती ची पाहणी करण्यासाठी काटोल तालुका कृषी, राजस्व तसेच ग्राम विकास विभागाचे अधिकार्यांना सोबत घेऊन जि प सदस्य सलील देशमुख, माजी जि प उपाध्यक्ष चंद्र शेखर चिखले, यांनी पाहणी केली व नुकसान भरपाई चे पंचनामे त्वरित सादर करण्याचे सूचना दिल्या. त्याच प्रमाणे
मागील वर्षातील नुकसानभरपाई तरी द्या? अशी मागणी मोरेश्वर भोयर, सतीश पुंजे, कपिल मानकर, नितीन ठवळे, चेतन पवार, गौरव वंजारी, सागर मानकर, शरद सोनोने, राजेश गणोरकर या शेतकऱ्यांनी केली आहे.