BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अमली पदार्थांच्या विरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

Summary

मुंबई दि. 7 : राज्यात अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले असून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर  ‘अमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. […]

मुंबई दि. 7 : राज्यात अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले असून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर  ‘अमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

राज्यातील व विशेषता मुंबईतील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा मंत्रालयात आयोजित बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला. या बैठकीला अपर मुख्य सचिव, गृह मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव, अपील व सुरक्षा, आनंद लिमये, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था राजेंद्र सिंग, विनीत अग्रवाल, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, मिलिंद भारंबे उपस्थित होते.

सद्यस्थितीत राज्यात अमली पदार्थांची वाढती आवक आणि सेवन हा चिंतेचा विषय बनला आहे. नशेच्या अमलाखाली गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. हे सर्व पोलीस विभागाने गांभीर्याने घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश  गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी दिले.

पोलीस यंत्रणेने अमली पदार्थ  प्रकरणी कारवाई करतांना सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील वाढत्या अमली पदार्थाच्या वापरावर सक्तीने नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अलीकडच्या काळात गावागावांत अमली पदार्थांची विक्री होऊ लागली आहे. शाळकरी मुले, युवा वर्ग यांच्यामध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. अमली पदार्थ म्हणून काही औषधी द्रव्याच्या वापर होतो आहे. या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने निश्चित करण्यात याव्यात असेही श्री वळसे पाटील यांनी सांगितले.  नशा येणाऱ्या पदार्थांची विक्री ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच सद्य स्थितीत बंद असलेल्या कारखान्यांचा देखील अमली पदार्थाच्या उत्पादनासाठी वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा सर्व ठिकाणी पोलिस, उद्योग आणि अन्न व औषध प्रशासन विभागांनी  संयुक्तपणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी यावेळी  संबधित अधिकाऱ्यांना दिले.

 

संपूर्ण राज्यातील पोलीस विभागाच्या प्रमुखांची गृहमंत्री यांचे अध्यक्षतेखाली याबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक श्री.पांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *