BREAKING NEWS:
नंदुरबार महाराष्ट्र हेडलाइन

अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत  

Summary

नंदुरबार, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे द्यावा. याकरिता  प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा तयार करावा. अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिल्यात. […]

नंदुरबार, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे द्यावा. याकरिता  प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा तयार करावा. अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिल्यात.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि आदिवासी विकास विभागाच्या योजना अभिसरणातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये करावयाच्या कामासंदर्भात मार्गदर्शनपर चर्चासत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

या चर्चासत्रास रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदिप गोलाईत, उपवनसंरक्षक के. बी. भवर, उपसचिव श्रीमती संजना खोपडे, कैलास साळुंखे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जि.प.सदस्य डॉ. सुप्रिया गावीत, राज्य गुणवत्ता नियंत्रण राजेंद्र शहाडे,कक्ष अधिकारी भरतसिंग निकुंभ, ीा  ‘रोहयो’चे राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे,राज्य समन्वयक प्रविण सुतार,धनजंय तिगोटे आदी उपस्थित होते.

यावेळी चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना पालकमंत्री डॉ. गावीत म्हणाले की, नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अभिसरणाच्या माध्यमातून अनेक कामे करता येतील यासाठी प्रत्येक विभागांनी 2 वर्षांचा आराखडा तयार करावा. आराखडा केल्यानंतर संबंधित विभागाचा निधी सहजतेने कसा उपलब्ध होईल यासाठी नियोजन करावे. नागरिकांना कृषी विभाग, वन विभागाच्या माध्यमातून तसेच विविध विभागामार्फत मनरेगाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देता येईल यासाठी नियोजन करावे. नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबत त्याचे राहणीमान सुधारण्यासाठी कुक्कुट पालन, शेळीपालन, गोठा, शेततळे आदी सर्व वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यात यावा. आश्रमशाळेतील मोकळया जागेत मनरेगाच्या माध्यमातून वृक्षारोपण करावे. तसेच मनरेगा आणि आदिवासी विकास विभागाच्या योजना अभिसरणाच्या माध्यमातून राबविण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. नंदकुमार म्हणाले की, प्रत्येक विभागाने अभिसरणाच्या माध्यमातून स्थलांतर व कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवून कामे करावीत. प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची एकत्रित सांगड घालून आरोग्य, शिक्षण, राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. नागरिकांचे स्थलांतर व कुपोषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी रोहयोच्या माध्यमातून गावातच त्यांना  अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. याकरिता कृषी, वने, जलसंपदा, पशुसंवर्धन तसेच इतर विभागांची मदत घेवून नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. रोजगार हमी योजनेच्या मनुष्यदिवस निर्मितीबरोबर लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढीवर भर देण्यात यावा. पालक स्थंलातर होत असेल तर त्यांची मुले स्थंलातर होणार नाही यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही तसेच गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील महिलांना कामानिमित्त कुटूंबास चविष्ठ पोषण आहार बनविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने लाभार्थ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून गॅस, कुकर उपलब्ध करुन द्यावे. जेणेकरुन कमी वेळेत ते कुटूंबातील सदस्य व बालकांस चांगला आहार बनवून देवू शकतील. यामुळे कुपोषणासारखे प्रश्न सोडविता येईल, असे त्यांनी सांगितले. चर्चासत्रात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. या चर्चासत्रास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *