अभिनयसंपन्न अभिनेत्री काळाच्या पडद्याआड – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
Summary
मुंबई, दि. 16 : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे. सिक्री यांच्या निधनाने एक अभिनयसंपन्न ज्येष्ठ अभिनेत्री आपण गमावली आहे, या शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दिल्लीच्या नॅशनल स्कूल […]
मुंबई, दि. 16 : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे. सिक्री यांच्या निधनाने एक अभिनयसंपन्न ज्येष्ठ अभिनेत्री आपण गमावली आहे, या शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतलेल्या सुरेखा सिक्री यांनी नाटकं, मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात काम केले असून अनेक चित्रपटांमधील त्यांच्या सहायक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. तमस, मम्मो आणि बधाई हो या चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, बालिका वधू या मालिकेतील भूमिका विशेष लोकप्रिय ठरली असून त्यांच्या कसदार अभिनयाने त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. आपल्या दर्जेदार अभिनयातून चित्रपट आणि मालिकांद्वारे घरा-घरांत पोहोचलेल्या सुरेखा सिक्री यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.