अन्यायग्रस्त कंत्राटी सफाई कामगारांसाठी शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा
तुमसर : शहराच्या घनकचरा गोळा करून डम्पिंग यार्डापर्यंत संकलन करण्याचा स्वच्छतेचा कंत्राट तुमसर नगरपालिकेच्या अंतर्गत शारदा महिला मंडळ हिवरा बाजार रामटेक जिल्हा नागपूर यांना २०१७ पासून देण्यात आला आहे. यामध्ये शहरातील अनेक युवक सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. परंतु कंत्राटदाराकडून कामगारांना मासिक वेतन फारच कमी मिळत असल्यामुळे व त्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि विमा यामध्ये तफावत असल्याने कामगारांनी आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. परिणामी १६ सफाई कामगारांना कामावरून काढण्यात आले. या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सफाई कामगारांनी कारारनाम्यानुसार कंत्राटदाराकडे मासिक वेतन वाढवण्याची मागणी केली होती. परंतु कंत्राटदाराने कारारनाम्यातील नियमांचे उल्लंघन करत कोरोनाचा लॉकडाऊन काळात मार्च २०२० मध्ये कोणतीही पूर्व सूचना ‘न’ देता अचानक कामगारांना कामावरून काढण्यात आले. या अन्यायाबाबत सफाई कामगारांनी शिवसेनेकडे धाव घेतली व त्याची लेखी स्वरूपात तक्रार केली होती. या अनुषंगाने शिवसेनेने सफाई कामगारांना कामावर घ्या, किमान वेतन कायद्याअंतर्गत मासिक पगार द्या आणि भविष्य निर्वाह निधी कपात करा. याविषयीचे निवेदन प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे सादर करून कामगारांची होत असलेल्या आर्थिक पिळवणूकीबाबत निदर्शनास आणून दिले होते. सदर याबाबतची तक्रार मा. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, मा. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय भंडारा, मा. मुख्याधिकारी नगरपालिका तुमसर, मा. पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन तुमसर तथा तुमसर विधानसभेचे आमदार यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र याविषयी प्रशासन, लोकप्रतिनिधी व कंत्राटदाराने दखल घेतली नाही. त्यामुळे अन्याग्रस्त सफाई कामगारांचा हक्कासाठी शिवसेनेने येत्या ७ सप्टेंबर सोमवारला तुमसर नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन पुकारला आहे. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घ्यावी. याविषयीचे निवेदन तहसील कार्यालय, तुमसर नगरपालिका व पोलिस स्टेशन तुमसर यांच्या माहितीसाठी ३१ ऑगस्ट सोमवार रोजी देण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, संतोष साखरवाडे सह सफाई कामगार उपस्थित होते.