महाराष्ट्र सातारा हेडलाइन

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा

Summary

सातारा, दि.24 (जिमाका) : गेली दोन तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करत अतिवृष्टीमुळे […]

सातारा, दि.24 (जिमाका) : गेली दोन तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली.

यावेळी  श्री. शंभूराज देसाई यांच्यासमवेत माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर, शिवदौलत बँकचे संचालक अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे, विकास जाधव, भरत साळुंखे, चंद्रकांत पाटील, डी.वाय.पाटील,गणेश भिसे, किसन गालवे यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

गेल्या दोन तीन दिवसांपासून पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह शेत जमिनी, पिके यांचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढ्यांसह नद्यांना पुराचे पाणी  येऊन पोहोच रस्ते, साकव पूल, शेत जमिनी यांचे मोठे नुकसान झाले असून गाव पोहोच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरडी पडण्यासह साकव पूल वाहून गेल्याने तसेच रस्ते खचल्याने डोंगरी व दुर्गम भागातील गावांचे दळण वळण ठप्प झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागामध्ये असलेल्या गावांचे आसपास भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या असल्याने डोंगराचा भाग व कडा कोसळण्याची  भिती असलेल्या गावांतील ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन त्यांना आवश्यक त्या सुविधा तातडीने पुरविणे गरजेचे असल्याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करुन नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. पाटण तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे विशेषत: डोंगरी व दुर्गम भागातील गावे, वाड्या वस्त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून काही गावांवर डोंगराचा भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर काही गावांतील घरे खचण्यास सुरुवात झाली असल्याने धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या गावांमधील नागरिकांना प्रथमत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. दरम्यान अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने मदत कार्यामध्ये अनेक अडचणी येत असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनींचे, पिकांचे, घरांचे तसेच रस्ते, साकव पूल, नळ पाणीपुरवठा योजना यांसारख्या सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे हे पाऊस कमी आल्यानंतर लगेचच करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना करण्यात आल्या असल्याचे सांगत मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून या मार्गावरुन प्रवास करु नये असे आवाहनही राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.

भूस्खलन होऊन बाधित झालेल्या मिरगाव (कामरगावं) येथील ग्रामस्थांना दिली तातडीची मदत

पाटण तालुक्यात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या कोयना विभागातील मिरगाव (कामरगाव) येथील बाधित सर्व कुटुंबांना एनडीआरएफ टीमच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या स्थलांतरित कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य तसेच अन्नधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घर पडझडीमुळे बाधित झालेल्या 500 कुटुंबांना सध्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी ,ब्लँकेट, सतरंजी इत्यादींची व्यवस्था शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *