अटल भूजल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री छगन भुजबळ
Summary
नाशिक दिनांक 7 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा): भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे भूजल पातळीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि घटणाऱ्या भूजल पातळीला आळा घालण्यासाठी केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील देवळा व सिन्नर तालुक्यातील एकुण 129 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेतील कामांचा दर्जा […]
नाशिक दिनांक 7 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा): भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे भूजल पातळीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि घटणाऱ्या भूजल पातळीला आळा घालण्यासाठी केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील देवळा व सिन्नर तालुक्यातील एकुण 129 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेतील कामांचा दर्जा आणि गुणवत्ता यावर विशेष लक्ष देवून प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अटल भूजल योजना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, डॉ.राहुल आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र शासन व जागतिक बँक यांचे संयुक्त विद्यमाने 100 टक्के केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेची देशातील 7 राज्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 13 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. निवड करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये अटल भूजल योजना राबवितांना स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून सदर योजना कालमर्यादेत राबविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. सदर योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता व झालेल्या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्ह्यांचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेंच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात येत असलेल्या पाण्याचे सुक्ष्म नियोजन आराखड्यामध्ये गावातील पाण्याचा ताळेबंद करून पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी मागणी व पुरवठा आधारीत उपाययोजना सुचवून त्यांचा ग्राम जलसुरक्षा आराखडा तयार करावा, अशा सुचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील देवळा तालुक्यांमधील 3 पाणलोट क्षेत्रातील 37 ग्रामपंचायतीमधील 42 गावे व सिन्नर तालुक्यांमधील 6 पाणलोट क्षेत्रातील 79 ग्रामपंचायतीमधील 87 गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी राज्यातील 13 जिल्ह्यांतील 38 तालुक्यामधील 73 पाणलोट क्षेत्र, 1339 ग्रामपंचायतीमधील एकुण 1443 गावांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अटल भूजल योजने अंतर्गत झालेली कामे, भूजलासंबंधी माहिती व अहवाल, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करणे, भूजल पुर्नभरण उपाययोजना, कार्यक्षम पाणी वापर पध्दतीचा अंगीकार करणे आदींबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागामार्फत श्री. बेडवाल यांनी सादरीकरणाद्वारे माहिती पालकमंत्री यांना सादर केली.