…अखेर सलील देशमुखांच्या प्रयत्नांना यश नरखेड व काटोलला मिळाले दोन रेल्वेचे थांबे
नरखेड, प्रतिनीधी
कोरानामध्ये रेल्वे बंद होती. यानंतर ही सेवा पुर्ववत सुरु झाल्यानंतर नरखेड व काटोलमध्ये कोरानाच्या पुर्वी ज्या रेल्वेगाडया थांबत होत्या त्यांचा थांबा हा बंद करण्यात आला होता. यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी प्रयत्न केले. स्वत: दिल्ली येथे जावुन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून नरखेड व काटोलला रेल्वे थांबे परत सुरु करण्याची मागणी केली होती. सलील देशमुख यांच्या या प्रयत्नाना यश आले असून नरखेड व काटोल येथे दोन रेल्वेगाडयांच्या थांबे पुर्ववत सुरु करण्यात आले आहे.
नरखेड व काटोल येथे अनेक रेल्वेगाडयांचे थांबे हे बंद करण्यात आल्याचा याचा फटका हा सामान्य नागरीक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना होत होता. हे थांबे सुरु होण्यासाठी या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून निवेदन दिले होते. काटोल येथे अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन सुध्दा करण्यात आले होते. काही दिवसांपुर्वी लोकसभेचे सत्र हे दिल्ली येथे सुरु असतांना सलील देशमुख यांनी थेट दिल्ली गाठली. रामटेकचे नवनियुक्त खासदार श्यामकुमार बर्वे यांची भेट घेवून त्यांना रेल्वे थांब्यासंदर्भात निवेदन दिले व लोकसभेत यासाठी आवाज उठविण्याची विनंती केली. दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून त्यांना सलील देशमुख यांनी निवेदन दिले.
दरम्यान श्यामकुमार बर्वे यांनी लोकसभेत यासाठी आवाज उठविला. नरखेड व काटोलला रेल्वे गाडयांना थांबे मिळण्यासाठी सलील देशमुख यांनी आपला सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरुच ठेवला आणि त्यामुळेच नरखेड व काटोलला दोन रेल्वे गाडयांचे थांबे मिळाले आहे. यामुळे या भागातील सामान्य नागरीक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. रेल्वे गाडयांचे थांबे दिल्याबदल सलील देशमुख यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व खासदार श्यामकुमार बर्वे यांचे आभार मानले आहे.
बॉक्स…
या रेल्वेगाडयांना मिळाला थांबा
नरखेड – जि.टी. एक्सप्रेस व जबलपुर एक्सप्रेस
काटोल – जबलपुर एक्सप्रेस व छत्तीसगड एक्सप्रेस फोटो ओळ – दिल्ली येथे खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन देतांना सलील देशमुख