BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अंधेरीतील ईएसआय दवाखान्याचे नूतनीकरण सहा महिन्यांत पूर्ण करावे – केंद्रीय सचिव आरती आहुजा

Summary

मुंबई, दि. २० : राज्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआय) कामगारांसाठी दवाखाने आहेत. त्यात १२ राज्य कामगार दवाखाने तर ६५ ठिकाणी राज्य कामगार विमा सेवा योजनाद्वारे कामगारांना आरोग्य सेवा दिली जाते. मुंबईतील अंधेरी येथे ५०० खाटांच्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली […]

मुंबई, दि. २० : राज्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआय) कामगारांसाठी दवाखाने आहेत. त्यात १२ राज्य कामगार दवाखाने तर ६५ ठिकाणी राज्य कामगार विमा सेवा योजनाद्वारे कामगारांना आरोग्य सेवा दिली जाते. मुंबईतील अंधेरी येथे ५०० खाटांच्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे २२० खाटांचे काम सुरु आहे. उर्वरित खाटांचे काम अग्निशामक विभागाच्या परवानगीने सहा महिन्यात नूतनीकरण पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ईएसआयसी योजनेंतर्गत आरोग्य सेवा आणि योजनांच्या आढावा बैठकीत श्रीमती आहुजा बोलत होत्या. यावेळी ईएसआयसीचे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार, राज्याचे आरोग्य आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह विमा योजनेचे आयुक्त उपस्थित होते.

श्रीमती आहुजा यांनी राज्यातील विमा दवाखान्यांचा आढावा घेतला. राज्यात ३९ लाख ९० हजार ४९० कामगार विमा योजनेच्या माध्यमातून दवाखान्याचा लाभ घेत आहेत. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता अंधेरी पूर्व येथील विमा दवाखान्यात खाटांची संख्या वाढविली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक विभागाची परवानगी घेऊन काम सुरू करावे. एकही कामगार विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. राज्यातील गडचिरोली, वाशिम, रत्नागिरी येथे दवाखान्यांना परवानगी मिळाली आहे. त्याची पुढील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. नंदुरबार आणि हिंगोली येथील सर्वेक्षण पूर्ण करून माहिती संकलित करावी. यावरही त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.

कोल्हापूर येथे १०० बेडपैकी ३० बेड सुरू आहेत तर बिबवेवाडी (पुणे) येथे १०० बेड पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. प्रत्येक दवाखाना परिसरात अग्निप्रतिबंधक सुरक्षा, परीक्षण यावर भर द्यावा. ज्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी असेल तिथे राज्य शासनातील निवृत्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्याच्या सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *