उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून मतदारसंघातील महिला बचत गटांना उपलब्ध करून देणार दीड दिवसांची बाजारपेठ येत्या 15 दिवसात अंमलबजावणी करण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश सिल्लोड येथे तालुकास्तरीय तर अजिंठा लेणी परिसरात बचत गटांसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करणार
फोटो कैप्शन : सिल्लोड येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार. यावेळी व्यासपीठावर पं. स. सभापती कल्पना जामकर, प्रतिभा जाधव, नगराध्यक्षा राजश्री निकम, प्रकल्प संचालिका संगीता पाटील आदी दिसत आहेत.
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.27, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात महिला बचत गटांच्या उत्पादित मालासाठी स्वतंत्र व्यापार संकुल तर तालुकास्तरावर पंचायत समितीचे दुकाने उपलब्ध करून ग्रामीण भागातील बचत गटांना मतदार संघातील जि. प.च्या शाळेमध्ये सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवार व रविवार असे दीड दिवसाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असून या संदर्भात येत्या 15 दिवसात अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यशाळेत दिले.
रविवार ( दि.27 ) रोजी शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील स्वयंसहायता समूह सदस्य / समूह संसाधन व्यक्ती यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सिल्लोड पं. स.च्या सभापती डॉ. कल्पना जामकर, सोयगाव पं. स.च्या सभापती प्रतिभा जाधव, नगराध्यक्षा राजश्री निकम, उमेद प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या रेखाताई वैष्णव, दीपाली भवर, मेघा शाह यांच्यासह युवानेते अब्दुल समीर,जिपचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे,कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, प. स. चे उपसभापती काकासाहेब राकडे, साहेबराव गायकवाड, दामुअण्णा गव्हाणे, गटविकास अधिकारी अशोक दांडगे ( सिल्लोड ) , सुदर्शन तुपे ( सोयगाव ) आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की , लोकसंख्येच्या प्रमाणात रेशन दुकानांची संख्या वाढवून रिक्त रेशन दुकाने महिला बचत गटांना देवू, महिला बचत गटांना टॅक्सी परवाना मिळावा तसेच मालमत्ता मध्ये महिलांच्या नावाचा समावेश करावा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. बचत गटांना मिळालेल्या कर्जाचा वापर उद्योग व्यवसायासाठीच करावा , नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना बँक जास्त मदत करतात. मतदार संघातील बचत गटांना अर्थ साहाय्य मिळूवुन देण्यासाठी स्वतः बँकेशी संवाद साधुन याबाबत पुढाकार घेवून बचत गटांना सीएसआर तसेच विविध योजनेतून आर्थिक सहाय्य देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. अडचणी जरूर आहेत पण यातून मार्ग काढून तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्या पासून प्रेरणा घेत पुढे जायचे आहे असे स्पष्ट करीत सरकार महिला बचत गटाच्या पाठीशी असून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांची सोडवणूक करून आर्थिक उन्नती साधण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी दिली.
———————————————–
बचत गटांच्या उत्पादित वस्तूंसाठी कायदेशीर बाबी लक्षात घेता त्यांना पॅकेजिंग व वस्तूंची काल मर्यादा या संदर्भात मार्गदर्शन देण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात एक युनिट तयार करणे, गुणवत्तापूर्ण वस्तू व पदार्थ करीत असतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरा संबंधी मार्गदर्शन करणे , महिला बचत गटांसाठी असलेल्या योजनांची माहिती गावागावात द्या, महिलांच्या आर्थिक उन्नती साठी आखलेली उद्दिष्टे निर्धारित वेळेत पूर्ण करा अशा सूचना देत महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरण व त्यांच्या विविध समस्यां सोडविण्याचे प्रमुख काम उमेद चे असल्याने समनव्यातुन महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या बळकटीकरणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उमेद च्या अधिकाऱ्यांना दिले.
———————————————–
मतदार संघातील 5 हजार महिलांना तीन वर्षात टप्याटप्याने रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना किमान 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केल्या जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक संगीता पाटील यांनी दिली. आदर्श ग्रामीण विकास संस्थेचे अनिल घुगे यांनी मतदार संघातील महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाच्या आढाव्याचे सादरीकरण केले. कार्यशाळेस सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्यांची उपस्थिति होती.
पोलीस योध्दा वृत्तसेवा
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ