BREAKING NEWS:
महाराष्ट्र

हक्कांसंदर्भात जागृती करुन ग्राहकांना अधिक सक्षम करणार – मंत्री छगन भुजबळ

Summary

मुंबई, दि. 24 : नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 यामधील तरतुदीनुसार राज्यातील ग्राहकांना अधिकाधिक संरक्षण कसे मिळवून देता येईल यासाठी  शासन कटिबद्ध असून हक्कांसंदर्भात जागृती करुन राज्यातील ग्राहक अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण […]

मुंबई, दि. 24 : नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 यामधील तरतुदीनुसार राज्यातील ग्राहकांना अधिकाधिक संरक्षण कसे मिळवून देता येईल यासाठी  शासन कटिबद्ध असून हक्कांसंदर्भात जागृती करुन राज्यातील ग्राहक अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी  केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे नवीन स्वरुप या विषयावर आयोजित वेबीनारमध्ये श्री.भुजबळ बोलत होते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनीही शुभेच्छा संदेश दिले.

ग्राहक संरक्षण मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, राज्यातील सर्व नागरिकांना, ग्राहकांना नव्या ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी, तयार असलेल्या कार्यप्रणालीची सक्षम पद्धतीने अंमलबजावणी करावी लागेल. सर्व ग्राहकांनी स्वतःच्या अधिकारांविषयी जागृत राहण्याची गरज आहे. झालेल्या फसवणुकीबद्दल ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागता येते. कोरोनाच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीमध्ये ग्राहकांना न्यायालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने न्याय मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे, राज्यभरातील ग्राहकांनी याची माहिती करून घेऊन उपयोग करून घ्यावा. विशेषतः  राज्यातील ग्राहक हे अधिक सक्षम व्हावेत, यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. यानिमित्ताने सर्व नागरिकांना ग्राहकांना शुभेच्छा देतो आणि ग्राहक फसवणूक मुक्त महाराष्ट्र होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्याचे आश्वासन देतो, अशी ग्वाही श्री.भुजबळ यांनी दिली.

या वेबिनारमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, राज्याने ग्राहकांच्या न्याय्य हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. प्रत्येक नागरिक हा ग्राहकच असतो. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. असे सांगून श्री.कदम यांनी ग्राहक दिनानिमित्त सर्व ग्राहकांना शुभेच्छा दिल्या.

वेबिनारमध्ये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे नवीन स्वरुप या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अन्य मान्यवर तज्ज्ञांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे नवीन स्वरुप या विषयावर मार्गदर्शन केले. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य डॉ.संतोष काकडे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमविषयक भूमिका विशद केली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *