सेवाभाव आणि करुणेमुळे कोरोनाविरुद्ध लढा यशस्वी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यपालांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान
मुंबई, दि.8 :- कोरोना संसर्गाच्या संकट काळात मानवसेवा हीच ईश सेवा आहे असे मानून लोकांनी सेवाभाव व करुणा जागवली. त्यामुळेच अमेरिका व इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाचा मुकाबला अधिक चांगल्या पद्धतीने केला, असे प्रशंसोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
भारतीय लोकांना भगवान बुद्धाची करुणेची शिकवण आहे. स्वामी विवेकानंद यांनी ‘मानव सेवा हीच ईशसेवा‘ हा संदेश लोकांना दिला आहे. करुणा व सेवाभाव जागविल्यामुळेच कोरोना काळात भारतीयांनी संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करून कोरोनाविरुद्ध लढा यशस्वी केला, असे राज्यपालांनी सांगितले.
भारतीय विकास संस्थान या सेवाभावी संघटनेतर्फे राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
समाजासाठी काम करण्याची इच्छा अनेकांना असते परंतु प्रत्यक्ष काम करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. समाजासाठी काम करणाऱ्या हिऱ्यांना एकत्र आणून त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हे देखील महत्त्वाचे कार्य आहे, असे सांगून राज्यपालांनी भारतीय विकास संस्थानचे कौतुक केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते खासदार गोपाळ शेट्टी, राज्य मानव आयोगाचे अध्यक्ष एम ए सईद यांसह विविध क्षेत्रातील नामवंत डॉ.क्टर्स, समाजसेवक व सेवाभावी संस्थाचा सत्कार करण्यात आला.
डॉ. संजीव मेहता, वॉक्हार्टचे संचालक डॉ. हुजेफा खोराकीवाला, डॉ. निमेश मेहता, डॉ. सुनिता, डॉ. श्वेता, के के सिंह, नितीन तिवारी, दिपक विश्वकर्मा, शुभम त्रिपाठी, शिवानी मौडगील, दिव्यांग रमेश सरतापे, डॉ. किशोर बाटवे, प्रभा विश्वमणी, डॉ. आगम वोरा, गायत्री फाउंडेशनचे डॉ. उत्तम यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगश दुबे यांनी प्रास्ताविक केले तर किडनीविकार तज्ज्ञ डॉ. संदीप भुरके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.