वांद्रे शासकीय वसाहतीतील समस्या सोडविण्यासंदर्भात सकारात्मक – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
Summary
मुंबई, दि. २८ : वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विभागाला दिल्या. वसाहतीच्या पुनर्विकासासंदर्भात पूर्ततेसाठी आपण लवकरच सर्व संबंधितांसह वसाहतीस प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जाहीर […]
मुंबई, दि. २८ : वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विभागाला दिल्या. वसाहतीच्या पुनर्विकासासंदर्भात पूर्ततेसाठी आपण लवकरच सर्व संबंधितांसह वसाहतीस प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जाहीर केले.
वांद्रे येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांसंदर्भात उपाययोजना करण्याकरिता विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत रहिवाशांना भेडसावत असलेल्या समस्या, दुरूस्तीकार्य, पुनर्विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के.टी.पाटील, सहायक अभियंता यु.डी. पालवे आणि श्रीमती दिघावकर, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागुल, कक्ष अधिकारी रा. मु.वडनेरकर, गव्हर्नमेंट क्वार्टर रेसिडेन्ट असोसिएशनचे अरूण गिते, प्रमोद शेलार, अशोक चव्हाण (चतुर्थ श्रेणी) यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
वांद्रे येथील शासकीय निवासी वसाहतीचे बांधकाम ७० वर्षे जुने असल्याने निवासी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निवासी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसंदर्भातील मोडकळीस आलेले बांधकाम, पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, वसाहतीत होत असलेले अनधिकृत बांधकाम, समाजमंदिर सभागृह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कौंटुबिक कार्यक्रमासाठी वापरास उपलब्ध न होणे, उपलब्ध झाल्यास अवाजवी भाडे आकारण्यात येणे, अशा विविध समस्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जाणून घेतल्या.
ठाणे अथवा नवी मुंबई येथे कार्यालयीन बदली झाल्यास शासकीय निवासस्थान सोडावे लागणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर तातडीने निवासस्थान सोडताना पाल्यांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार व्हावा या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491