रोजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण
Summary
मुंबई, दि. 25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
मुंबई, दि. 25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, लॉकडॉऊन काळातही विभागामार्फत एक लाख अठ्ठेचाळीस हजार रोजगार उपलब्ध केले आहेत ही चांगली बाब आहे परंतु लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत जसे रोजगार निर्माण होतील त्याला अनुसरून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम विभागाने करावे. यासाठी सविस्तर असा कृती आराखडा लवकर तयार करण्यात यावा. तसेच ऑन जॉब प्रशिक्षण योजना कार्यान्वित करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI )नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करण्यात यावा
प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक रचना स्थानिक परिस्थितीनुसार रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. समृद्धी महामार्गालगतच्या जिल्ह्यांत नवीन रोजगार उपलब्ध होतील त्याप्रमाणे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे नियोजन करावे असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह यांनी आयुक्तालयामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले.