रायगड येथील जेट्टी दुरूस्ती व रूंदीकरणासंदर्भात कार्यवाहीस गती द्यावी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
Summary
मुंबई दि. ८ : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत रायगड येथील जेट्टीची दुरूस्ती आणि रूंदीकरणासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. वीज, सॅटेलाईट, स्वच्छता गृहे, रस्ता दुरूस्ती करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. जेट्टी परिसरात उपलब्ध जागेची तपासणी करून डिझेल पंप आणि शीतपेटी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाहीस […]
मुंबई दि. ८ : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत रायगड येथील जेट्टीची दुरूस्ती आणि रूंदीकरणासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. वीज, सॅटेलाईट, स्वच्छता गृहे, रस्ता दुरूस्ती करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. जेट्टी परिसरात उपलब्ध जागेची तपासणी करून डिझेल पंप आणि शीतपेटी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
मंत्रालयात अलिबाग येथील जेट्टीची दुरूस्ती व रूंदीकरण तसेच अद्ययावत सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीस रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव एस जी शास्त्री, सहआयुक्त राम जाधव, सहआयुक्त एस आर भारती, कार्यकारी अभियंता दै.स.पवार आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले, बंदरावर एकाच वेळी मर्यादीत नौका उभे करण्याची सोय आहे. व मच्छिमारांची संख्या पाहता जेट्टीची लांबी १५ ते २० मीटर वाढविणे गरजेचे आहे. मच्छिमारांना डिझेल वाहतूक करणे सोयीस्कर जावे यासाठी जेट्टीलगत जागेची पाहणी करून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत डिझेल पंप उपलब्ध करून देणे, जीवना कोळीवाडा आणि भरडखोल येथे शीतपेट्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करावी. जिल्हा नियोजनक विकास परिषदेमधून मच्छिमारांसाठी प्रकाश योजना, स्वच्छतागृह पाणीपुरवठा करण्यात याव्यात. सॅटेलाईट संदर्भातील कामे, फिशींग पास स्टँपिगसाठी अधिकारी नेमणे, जेट्टीला येणारा रस्ता दुरूस्त करण्याचे काम तातडीने करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.