रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सुटणार; ५ डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्यात येणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Summary
जळगाव (जिमाका) दि. २७ – रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. येथीलअजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समीतीच्या बैठक […]
जळगाव (जिमाका) दि. २७ – रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
येथीलअजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समीतीच्या बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आनंद मोरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एम. एस.आमले, कार्यकारी अभियंता धर्मेद्रकुमार बेहरे, सल्लागार समीतीचे सदस्य प्रशांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, दत्तु ठाकूर, पाचोरा, भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मालेगाव महानगरपालिका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे व नाशिक, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी यांचेसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गिरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या तीन आवर्तनामुळे रब्बी हंगामास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून गिरणा प्रकल्पामुळे 23905 तर पांझण प्रकल्पामुळे 3642 असे एकूण 27 हजार 544 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. शेतकऱ्यांना गव्हाणी पेरणी करावयाची असल्याने पहिले आवर्तन तातडीने सोडण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे पाटबंधारे विभागाने येत्या 5 डिसेबरला पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीला मोठी मदत होणार आहे. तर त्यानंतर पुढील आवश्यकता लक्षात घेऊन दोन आवर्तन सोडावे असा आग्रह पालकमंत्री यांनी घेतल्याने याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बहरणार
गिरणा धरण सलग दुसऱ्यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय पालकमंत्री यांनी घेतला. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणावर एकूण 69 हजार 350 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील 57 हजार 209 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.
तर गिरणा धरणातून मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा नगरपालिका, मजीप्राच्या 2 योजना यात मालेगाव तालुक्यातील 25 गावे व नांदगाव तालुक्यातील 56 खेडी योजना त्याचबरोबर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल तालुक्यातील 154 गावांना पिण्यासाठी पाणी पुरविण्यात येते. यानुसार हे पाणी वगळून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याबाबत तसेच सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली व थकबाकीबाबतही बैठकीत चर्चा झाली.
गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवानी रब्बी हंगामासाठी पाणी हवे असल्यास तत्काळ त्या त्या शाखांकडे फार्म भरण्याबाबत सहकार्य करावे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करता येईल. असे आवाहन धर्मेद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे जळगाव यांनी केले आहे.