मोबाईल क्लिनिक व्हॅन आरोग्यासाठी पर्वणी ठरेल – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ५ मोबाईल क्लिनिकचे लोकार्पण
भंडारा, दि. १० : कोविड-१९ प्रभावित भागात नागरिकांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी तयार करण्यात आलेल्या 5 मोबाईल क्लिनिक व्हॅनचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज करण्यात आले. मोबाईल क्लिनिक व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावात केवळ कोविडच नव्हे तर मधुमेहसारख्या गंभीर आजाराचे निदान व उपचार करण्यात येणार आहे. आरोग्यासाठी मोबाईल व्हॅन परवनी ठरणार आहे असे ते म्हणाले. नाना पटोले यांच्या पुढाकारानेच हा फिरत्या दवाखाण्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त व अन्य आजाराच्या रुग्णांवर त्वरीत उपचार केले जातील. वैद्यकीयदृष्ट्या अतिशय सुसज्ज अशा 5 मोबाईल क्लिनिकचा लाभ जिल्ह्यातील अनेक नागरिकांना होणार आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे व कौस्तुभ बुटला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अत्याधिक कोविड प्रभावित भागात कंटेनमेंट ठिकाणी मोबाईल क्लिनिक व्हॅन तैनात असतील जे लोक रुग्णालयात जाऊ शकत नाही अशा लोकांवर उपचार करण्यासाठी सरकारने अशा भागात व इतर भागात मोबाईल क्लिनिक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोबाईल क्लिनिक व्हॅन केवळ उपचारच करणार नाही तर लक्षणांनुसार आणि रुग्णांच्या आजाराच्या इतिहासानुसार वैद्यकीय उपचार देणार आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचारासाठी पुढे पाठविण्याचे कामही याव्दारे करण्यात येणार आहे.
मोबाईल क्लिनिक व्हॅनमध्ये खालील गोष्टी असणार आहेत. डॉक्टर, ड्रायव्हर, हँड सॅनिटाझर, फॉर्म व केस पेपर, पीपीई किट, स्टेथोस्कोप, इन्फ्रारेड गण, ब्लड प्रेशर कफ मॉनिटर, कपडा मास्क, ऑक्सीमीटर, मलमपट्टी साहित्य, ग्लुको मीटर व औषधे इत्यादीचा समावेश आहे.
उपचार आपल्यादारी या तत्वावर मोबईल क्लिनिक काम करणार आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये एक डॉक्टर व त्यांची टीम असणार आहे. पल्स ऑक्सिमिटर, ताप तपासणी यंत्र व मेडिसीन या व्हॅनमध्ये उपलब्ध असेल. ताप तपासणे, रक्तदाब तपासणे, मधुमेह तपासणी आदी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. नागरिकांना अगदी मोफत औषधी देण्याची व्यवस्था या व्हॅन सोबत आहे. गंभीर आजार असलेल्या रूग्णांना संदर्भीय सेवा सुद्धा देण्यात येईल. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यात फिरून नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे.
यापुर्वीसुध्दा विधानसभा अध्यक्षांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अशा प्रकारची मोबाईल क्लिनिक सेवा देण्यात आली आहे. हे विशेष. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.