मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
–
मुंबई वार्ता:- दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!
ही दिवाळी तुम्हाला सुख-समाधानाची व आनंदाची जावो हीच प्रार्थना🙏🏼
होळीपासून सुरुवात झालेले सगळेच सण आपण अत्यंत साधेपणाने साजरे केलेत. या सर्व ६-८ महिन्यांमध्ये आपण सर्वांनी जे सहकार्य केले आहे, त्याला तोड नाही. त्यामुळेच आपण आता थोडेसे तणावमुक्त आहोत.
तणावमुक्त जरी असलो तरी माझ्या मनामध्ये पुढची, दुसऱ्या लाटेची जी एक शक्यता आहे, ती येऊ नये म्हणून चिंता वाटते, तीच प्रार्थना आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचे सहकार्य मला अपेक्षित आहे.
हळूहळू सर्व काही आपण उघडलेलं आहे, सर्व व्यवहार जवळपास पूर्वपदावर आले आहेत. गर्दी वाढत चाललेली आहे, ती वाढणे चांगले आहे, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. मात्र, इथेच आपल्याला खबरदारी घ्यायची आहे आणि तीच विनंती करण्यासाठी आज मी आपल्याशी संवाद साधत आहे.
आपण बघत असाल गेल्या काही दिवसांत, मुंबई-पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाचा जो काही चढ होता, तो आपण खाली आणलेला आहे. पण देशात इतरत्र विशेषत: दिल्लीमध्ये आकडा वाढत आहे.
दिल्लीत आकडा वाढण्याचे कारण, मी जे ऐकलंय ते प्रदूषण हे आहे. म्हणजेच काय, तर दिवाळी साजरी करताना फटाक्यांवर बंदी आणायची का? प्रत्येक ठिकाणी बंदी घालून, कायदे कडक करून जीवन पुढे चालू ठेवायचं का? आत्तापर्यंत तुम्ही पाळलंत तसं स्वत:हून आपण आपल्या गोष्टी पाळू शकत नाही का?
अजूनही औषध-लस नाही आणि प्रदूषणामुळे हा विषाणू वाढत असेल तर दिवाळीत आपण प्रदूषण करणारे फटाके वाजवणं टाळू शकतो का? आत्तापर्यंत जे आपण साधलं आहे, जे कमावलं आहे ते चार दिवसांच्या धुरामध्ये वाहून जाता कामा नये! म्हणून मी विनंती करतोय सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीत.
समाजाला, एकमेकांना त्रास न देता जेवढे मर्यादित फटाके तुम्ही वाजवू शकता, ते वाजवा. मी अगदीच काही आणीबाणी नाही आणत आहे तुमच्यावर! फटाक्यांवर बंदीच घालतो असं न म्हणता, आपण एकमेकांच्या विश्वासावर हा सण आनंदाने साजरा करूयात.
मात्र पुन्हा सांगतो. आता जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे असे वाटत असले तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचं कारण पश्चिमात्य देशांत आपण जे काही पाहतोय, प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुसरी लाट आली आहे.
गेले ६-८ महिने आपली यंत्रणा, मग ते डाॅक्टर्स, पोलिस, आरोग्य सेवक, हे अत्यंत तणावाखाली या लढाईमध्ये लढत आहेत. ते कोणासाठी लढत आहेत? अनेक पोलिस मृत्युमुखी पडले आहेत, आरोग्य सेवकांना बाधा झाली आहे. कोणासाठी?
मी परवा व्हिडीओ पाहिला एका सैनिकाचा. तो सैनिक आपल्याला सांगतोय, मी तुमच्यासाठी लढत असताना बुट किती किलोचे आहेत, पाठीवर किती किलो दारूगोळा आहे, हेल्मेट किती किलो आहे. याचा विचार न करता,हे सारं वजन घेऊन जर मी तुमच्यासाठी लढतोय, तर तुम्ही साधा मास्क घालून कोरोनाशी लढाई लढू शकत नाही?
ज्या आरोग्य सुविधा आपण वाढवत आहोत, त्याला देखील काही मर्यादा आहेत. जेव्हा ही साथ सुरू झाली तेव्हा आपल्याकडे सगळे मिळून ७.५-८ हजार रूग्णशय्या होत्या. आता त्याची संख्या आपण ४ लाखांपर्यंत नेली आहे. म्हणजेच या सर्व गोष्टी वाढवता येतील पण डाॅक्टर्स आणि आरोग्य सेवक कुठून आणायचे?
दसऱ्यापर्यंत आपण माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली. राज्यभरात जवळपास ६० हजार टीम आपण तयार केल्या होत्या. या मोहिमेत जवळपास साडेतीन लाख प्रथमदर्शनी रूग्ण आढळून आले. त्यात ५१ हजार कोवीड पॉझिटिव्ह होते. या मोहिमेमुळे योग्य उपचार करून आपण या रूग्णांना वाचवू शकलो.
माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेतील त्या ६० हजार टीममधील प्रत्येकाला मी हात जोडून नमस्कार करतो. महाराष्ट्र आपला ऋणी आहे. आपण अहोरात्र मेहनत केलीत, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मेहनत केलीत.
१०० वर्षांपुर्वी स्पॅनिश फ्लूची साथ आलेली. त्या वेळी या फ्लूने देशभरात जवळपास एक कोटी जीव घेतले. १०० वर्षांपुर्वी लोकसंख्या काय होती, त्यातले १ कोटी व आत्ता लोकसंख्या काय आहे? मी तुम्हाला घाबरवत नाही. मात्र, सतर्क रहाण्यासाठी म्हणून या प्रेमाच्या व सावधगिरीच्या सूचना.
आज आपल्याकडे लस नाही, औषध नाही. स्पॅनिश फ्लूच्या वेळी देखील हीच त्रिसूत्री होती. मास्क घाला, अंतर ठेवा, हात धूवत रहा. मुंबईत व बाहेर मास्क न घालणारे खूप लोक दिसतात. ते चालणार नाही! जो मास्क घालणार नाही त्याला दंड हा केला जाणारच!
तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला वाईटपणा घ्यायची आवश्यकता असेल आणि जर कोणी मला वाईट म्हणत असेल तरी तुमच्या हितासाठी मी तो वाईटपणा घ्यायला कधीही तयार आहे.
कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचे जे कारस्थान केलं होत ते तोडून-मोडून काढत आपण जूनमध्ये १७००० कोटींचे सामंजस्य करार केले आणि मला त्याचा अभिमान आहे.
गेल्या आठवड्यात सुद्धा आपण ३५००० कोटींचे सामंजस्य करार केले, अनेक देशी विदेशी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार आहेत ज्याचा आपल्याला अभिमान आहे. हे सगळं तुमचं कर्तृत्व आहे. आपण एक महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण केली आहे त्याचे हे फलित आहे.
हे सामंजस्य करार म्हणजे नुसते कागदावर करून पावसाळा होता म्हणून कागदी होड्या करून सोडून नाही देण्यात आल्या. तर त्यात अनेक जणांना जागासुद्धा दिल्या गेल्या आहेत, पुढे सुद्धा दिल्या जातील आणि प्रत्यक्ष काम सुद्धा तिथे सुरू होईल.
दोन दिवसांपूर्वी मेट्रो साठी आपण जर्मनीच्या KFW कडून जवळपास ५४५ दशलक्ष युरो एवढ्या रकमेचे कर्ज अत्यंत माफक व्याजदरात घेतले आहे.
आपल्या राज्यामध्ये जे माजी सैनिक आहेत, त्या माजी सैनिकांना आणि दुर्दैवाने जे शहीद झाले आहेत त्यांच्या विधवांना त्यांच्या निवासी मालमत्तेचा कर आणि घरपट्टी माफ करण्याची योजना आपण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अंमलात आणतोय.
जे जे मुंबईकरांच्या अणि माझ्या राज्याच्या हिताचे असेल ते टीकेची पर्वा न करता आपण करणार म्हणजे करणारच!
आता आपण जवळपास सगळ्याच गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे सुद्धा काही टक्के उपस्थिती ठेऊन उघडायला परवानगी दिलेली आहे. व्यायामशाळा, रेस्टॉरंट, ग्रंथालय, वाचनालये सुरू झालेली आहेत. मुंबईतील सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे.
सगळ्यांचा प्रश्न आहे की आमच्या साठी लोकल कधी सुरू होणार? त्यासंदर्भात केंद्रासोबत बोलणं सूरू आहे. त्यांच्याकडून जसजशी परवानगी येत आहेत, तशी आपण लोकल सुरू करतो आहोत. पियुष गोयल जी ही चांगले सहकार्य करत आहेत. ते सुद्धा आपल्याला मदत करतील ह्याची आम्हाला खात्री आहे.
सगळे विचारताहेत मंदिरं कधी उघडणार? उघडणार आहोतच. पण, जरा हे दिवाळी आणि नंतरचे १५ दिवस जाऊद्या. ज्येष्ठांनी बाहेर पडू नये म्हणून आपण जपतोय. या सगळ्यांची काळजी घेऊनच हा निर्णय घेतलाय आपण. लवकरच त्यासाठीही नियमावली बनवू. चपला मंदिराबाहेर काढा पण मास्क कधीच काढू नका.
आपण माझे आपुलकीने, प्रेमाने ऐकून त्याप्रमाणे वागत आलेला आहात आणि तसे तुम्ही वागला नसतात तर आजचे आकडे आपण तिथपर्यंत नेऊ शकलो नसतो. हे आकडे आपल्याला शून्यावर न्यायचे आहेत आणि आपण ते करू शकतो.
सर्वांनी आनंदात आणि निरोगी रहा. मास्क लावा, सतत हात धूत रहा आणि एकमेकांपासून अंतर ठेवा.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053