मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
Summary
मुंबई, दि. 11 : मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात […]
मुंबई, दि. 11 : मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार अशोक लांडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले, 1995 च्या कायद्यानुसार जे झोपडपट्टीधारक अपात्र होते त्यांना नियमानुसार 2011 च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती देण्यात यावी.
कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेमध्ये असून या ठिकाणी 17 हजार 200 घरे आहेत. यापैकी काही घरे मोडकळीस किंवा जीर्ण झाली आहेत. तसेच मिठी नदी पात्रात काही घरे आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करून इतर ठिकाणी त्यांना घरे बांधून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491