माघी दशमी व एकादशीसंदर्भात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा महत्वपूर्ण निर्णय
कोरोनाचे सावट अद्यापही संपले नाही. बरोबर कोरोनाची लस अनेकांना देणे बाकी आहे. यामुळे माघी यात्रा नियम व अटीनुसार होणार आहे. मात्र दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार असून द्वादशी (ता. 24) पासून पूर्ववत भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांना दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सह. अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली.
यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
श्री. औसेकर महाराज म्हणाले, कोरोनाचे सावट अजून पूर्ण संपलेले नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू असून, अद्याप अनेकांना लस देणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 फेब्रुवारी रोजी माघी एकादशीचा सोहळा होणार आहे.
त्या वेळी भाविक पंढरपूरला मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी होऊ नये यासाठी दक्षता म्हणून दशमी आणि एकदशी असे दोन दिवस भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असताना मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भाविकांना येऊ द्यायचे किंवा नाही अशा विषया संदर्भात शासन निर्णय घेईल.
यात्रा काळात एकदशीपासून पौर्णिमेपर्यंत परंपरेनुसार जे नियम चालत आलेले आहेत ते सर्व होतील, असेही श्री. औसेकर यांनी स्पष्ट केले.
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750