BREAKING NEWS:
महाराष्ट्र

महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक

Summary

मुंबई, दि. ५ : महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून मुख्यमंत्री कार्यालयात महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील […]

मुंबई, दि. ५ : महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून मुख्यमंत्री कार्यालयात महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील, असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  प्रधान सचिव विकास खारगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, जल जीवन मिशनच्या संचालक श्रीमती आर विमला, माविमच्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसुम बाळसराफ, माजी महापौर विशाखा राऊत, श्रीमती गीता कांबळी, श्रीमती संगीता हसनाळे,  श्रीमती रंजना मेवाळकर आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, महिलांनी आता बचतगट आणि त्यांची पारंपरिक पापड, मसाले आदी उत्पादने याच्या पलिकडे जाऊन नवीन संधी शोधल्या पाहिजेत. महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादननिर्मितीची सांगड घालावी लागेल. त्यासाठी माविम, उमेदच्या (राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान) उपक्रमांना व्यापक स्वरुप देत महिलांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीचे कार्यक्रम अधिक गतीने हाती घ्यावे लागतील, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

सेवाक्षेत्राची होत असलेली प्रचंड वाढ पाहता महिलांनी आता केवळ वस्तूनिर्मितीपर्यंतच मर्यादित न राहता सेवाक्षेत्रातील संधींकडे पाहिले पाहिजे, एनआरएलएमने ज्याप्रमाणे बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर आणली आहेत तसेच माविम ज्या प्रकारे स्वत:चे ई- बिझनेस प्लॅटफॉर्म विकसित करत आहे त्याप्रमाणे महिलानिर्मित उत्पादनांना व्यापक प्रमाणात ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे.

महिला बचत गटनिर्मिती वस्तू विक्रीसाठी ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर मार्ट उभारली जावीत, आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव श्रीमती स्मीता निवतकर यांनी महिला विकासाच्या योजनांची माहिती संकलित केलेली पुस्तिका यावेळी सादर केली.

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *