दापचरी दुग्ध प्रकल्पातील कृषी क्षेत्रधारकांच्या अडचणी दूर करणार – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार
Summary
मुंबई, दि.2 : दापचरी दुग्धप्रकल्पातील कृषी क्षेत्रधारकांच्या भाडेपट्टयावर दिलेल्या जमिनीबाबत व त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. मंत्रालयात दुग्ध प्रकल्प दापचरी येथील कृषी क्षेत्र धारकांच्या अडचणींविषयी बैठक आयोजित करण्यात […]
मुंबई, दि.2 : दापचरी दुग्धप्रकल्पातील कृषी क्षेत्रधारकांच्या भाडेपट्टयावर दिलेल्या जमिनीबाबत व त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
मंत्रालयात दुग्ध प्रकल्प दापचरी येथील कृषी क्षेत्र धारकांच्या अडचणींविषयी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री केदार म्हणाले, दापचरी दुध प्रकल्प येथील उपसा जल सिंचन केंद्रावरील सर्व विद्युत मोटारी बंद असल्याने शेतीला होणारा पाणीपुरवठा बंद असल्याविषयीची समस्या समजून घेण्यासाठी आणि सोडविण्यासाठी महावितरण कंपनीसोबत सात बैठक घेण्यात येणार आहे. तसेच विद्युत दराबाबत आणि उच्च दाब विद्युत पुरवठा कमी दाबात रूपांतरित होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
केनॉल दुरुस्ती निधी उपलब्ध करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. याबरोबरच मुख्य, कालवा, पोटचाऱ्या, रस्ते उखडले आहेत.त्याची दुरुस्ती व कृषी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.