डोंबिवलीत पिस्टलसह गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्रीसाठी आलेला तस्कर गजाआड
डोंबिवली : प्रतिनिधी
एक पिस्टलसह गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस घेऊन डोंबिवलीत विक्रीसाठी आलेल्या तस्कराला गजाआड करण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सागर देवीप्रसाद सिंग (३०, रा. गावदेवी मंदिर रोड, डोंबिवली पूर्व) असे आरोपी तस्कराचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा ते भोपर गावाच्या कामिनी परिसरात एक इसम अवैध अग्नीशस्त्रसाठा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मृदगून , मारोती दिघे, पोह. दत्ताराम भोसले, अरविंद पवार, अजित राजपूत, मंगेश शिर्के, प्रकाश उर्फ बाळा पाटील, हरिचंद्र बंगारा यांनी काल सायंकाळच्या सुमारास खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी परिसरात सापळा रचून आरोपी सागर सिंग याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती व त्याच्या जवळ असलेल्या एका प्लास्टिक पिशवीत झडती घेतली असता एक पिस्टल, एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस आढळून आले. त्यांनतर गुन्हे पथकातील पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विवीध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
कोणाचा गेम करण्यासाठी कि: गुन्हेगाराला विकण्यासाठी ?
महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कोणाचा गेम करण्यासाठी पिस्टल व गावठी कट्टा घेऊन आला होता का? कोणा गुन्हेगाराला विकण्यासाठी आला होता. शिवाया आरोपी तस्कराचे कोण्या गुन्हेगारी टोळीशी कनेक्शन आहे का ?
याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मृदगून करत आहे. तर आज आरोपी तस्कराला न्यायालयात हजर केले असता ५ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जगदीश जावळे