चंद्रपूर जिल्ह्यात रायफल व जिवंत काडतुसासह काँग्रेस कार्यकर्त्यास अटक :सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याची कबुली
चंद्रपूर : घुग्घूस पोलिसांनी एसीसी सिमेंट कंपनीत चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश करून सुरक्षारक्षकाला मारहाण केल्या प्रकरणातील आरोपींना रविवार, 31 जानेवारीला नकोडा येथून अटक केली. चिट्टी ऊर्फ भीमय्या सोपर (26), प्रशांत मालवेणी (24), कार्तिक कोडापे (26), विजय तामकाने (24), सेमत पिंगली (19, सर्व रा. नकोडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून रायफल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, येथील एका काँग्रेस नेत्याचे समर्थक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
20 जानेवारी रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास 5 ते 6 अज्ञात आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने एसीसी कंपनीच्या आवारात शिरले होते. त्यांना कर्तव्यावर असलेला सुरक्षा रक्षक श्यामसुंदर प्रजापती यांनी हटकले असता यातील एका आरोपीने सुरक्षारक्षकावर हल्ला केला व पायावर काठीने मारून जखमी केले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाले. याबाबतची तक्रार सुरक्षारक्षकाने घुग्घूस पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूध्द कलम 325, 324, 323 (34) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान घुग्घूस गुन्हे शोध पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी एसीसी कंपनीच्या सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याची कबुली दिली.
तसेच अधिक कसून चौकशी केली असता यातील तीन आरोपी चिट्टी ऊर्फ भीमय्या सोपर, प्रशांत मालवेणी व कार्तिक कोडापे यांनी 22 जानेवारीला एसीसी कंपनीच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिंदोला कोळसा खाण येथील एका सुरक्षारक्षकावर हल्ला करून त्याच्या ताब्यातील एक रायफल व जिवंत काडतूस हिसकावून पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींकडून एक रायफल व 5 जिवंत काडतूस जप्त केले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत, गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, रंजित भुरसे, मनोज धकाते, महेंद्र वन्नकवार, सचिन डोहे, नितीन मराठे, रवी वाभीटकर यांनी केली. घटनेचा पुढील तपास मंगेश निरंजने करीत आहे. आरोपींविरूध्द दारू तस्करीसह अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर