क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
Summary
मुंबई, दि.28 : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी, बहुजन समाजाबद्दलचे त्यांचे धोरणच राज्याला व देशाला विकासाच्या वाटेवर […]
मुंबई, दि.28 : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी, बहुजन समाजाबद्दलचे त्यांचे धोरणच राज्याला व देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल, अशा शब्दात त्यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सन्मानाने जगण्याची ताकद दिली. स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातिभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी त्यांची धोरणे शेतकरी व बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून आखली पाहिजेत, हा विचार दिला. महात्मा फुले यांनी दिलेल्या विचारांनी व दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा आपण निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना आदरांजली वाहून अभिवादन केलं आहे.