कोविड १९ अनुषंगाने शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करा – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद, दिनांक ०९ (जिमाका) : कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या हितासाठी व कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आजपासून सुरू करण्यात आली. मात्र, लेणीत उद्या 10 डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. तरीही कोविड 19 अनुषंगाने सर्व सूचनांचे पालन व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि पर्यटकांनी करावे, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. तसेच अजिंठा लेणी पाहण्यास जगभरातील पर्यटकांनी अजिंठ्यात येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार यांच्याहस्ते झाला. यावेळी अजिंठ्याचे उपसरपंच शेख मुन्शी, सभापती रस्तूल बी उस्मान खान, रघुनाथ चव्हाण, देविदास लोखंडे, प्रभाकर काळे, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे श्री.क्षीरसागर, भारतीय पुरातत्व विभागाचे शेख कलिमोद्दीन, अजिंठा गाईड असोसिएशनचे सय्यद अबरार, अजिंठा हस्तकला व परिसर विकास असोसिएशनचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, मागील नऊ महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बंद होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने व्यापारी, छोटे व्यावसायिक, गाईड, पर्यटक आदींचा विचार करत अटी व शर्तींसह अजिंठा लेणीमध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश देण्यास उद्यापासून सुरुवात केली आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, मात्र येथील सर्व व्यापारी, छोटे व्यावसायिक यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यादृष्टीकोनातून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर कटाक्षाने करणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. येथील नियमांचे पालन जगभर जाणार असल्याने त्रिसूत्रीचा अवलंब आवश्यक आहे, असेही श्री. सत्तार यांनी म्हणाले. तसेच अजिंठा लेणी परिसरात असलेल्या व्यावसायिकांच्या अडीअडचणीही लवकरच दूर करण्यात येतील. लेणीत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, त्यानंतरच लेणीत प्रवेश मिळणार असल्याचेही श्री. सत्तार म्हणाले. महाराष्ट्र शासनाने अजिंठा लेण, जिल्हयातील इतर पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिल्याबाबद्दल शासनाचे आभारही श्री. सत्तार यांनी मानले.
सुरुवातीला अजिंठा हस्तकला व परिसर विकास असोसिएशन, अजिंठा गाईड असोसिएशन आणि प्रशासनाच्यावतीने राज्यमंत्री श्री. सत्तार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पप्पीन्धर पालसिंग उर्फ वाय टी महाराज, श्री. शेख, श्री. पांडे यांनी विचार मांडले.
यावेळी आबा काळे, गोपी जाधव, दुर्गाताई पवार, श्री. नासेर, विठ्ठल आगळे, रमेश कापसे, अब्दुल अजीज, महेबूब पठाण, इम्रान शाह, राधेश्याम जाधव आदींचीही उपस्थिती होती.