‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी युव्ही-३६० सॅनिटायझर रोबोट उपयुक्त ठरेल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई-उद्घाटन
Summary
मुंबई, दि. ५ : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कोठेही मागे नाही. कोविड काळातही या आजाराचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा) […]
मुंबई, दि. ५ : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कोठेही मागे नाही. कोविड काळातही या आजाराचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा) उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. या उद्घाटन सोहळ्यास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी. शिर्के, प्रा.महेंद्र शिरसाठ, अमित किमटकर, सुबोध भालेराव व संबंधित उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, रुग्णालये, हॉटेल्स, व्यावसायिक जागा आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी या रोबोटचा उपयोग होईल. तंत्रज्ञान विकसन प्रक्रियेत आधुनिक महाराष्ट्र कोठेच कमी नाही. विशेषतः विद्यापीठात हे तंत्रज्ञान विकसित झाले याचा आनंद आहे. राज्यातील रोबोटिक्स क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असून भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या या जागतिक संकटाशी लढत असताना अजूनही लसीचे संशोधन झाले नसल्यामुळे या रोबोटची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडचा सामना करण्यासाठी सॅनिटायझिंग टनेल, युव्ही -सी टॉर्च आदी संशोधने होत असताना हे रोबोटचे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या संशोधनाच्या निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे काम कौतुकास्पद असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण असून या तंत्रज्ञानाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. जोपर्यंत एखादी चांगली संकल्पना वास्तविक रुपाने लोकांच्या उपयोगात येत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना तिचे महत्त्व नसते. अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांना उचलून धरत त्यांच्या जोपासनेसाठी पाठबळ उभे करायला हवे, असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.
युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे तंत्रज्ञान हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे आहे. महाविद्यालये, विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या एकत्रीकरणातून या संशोधनाची निर्मिती झालेली आहे. संशोधनासाठी अशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. आर.जी. सोनकवडे यांच्या प्रयत्नातून ‘युव्ही – ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट'(तारा)ची निर्मिती झाली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे कोरोना विषाणू व तत्सम सुक्ष्मजीवांचे निर्जंतुकीकरण करणे साध्य होणार आहे.
या रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) होय. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तात्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे. तसेच खोलीमध्ये फिरताना अडथळ्यांवर थडकून तो खराब होऊ नये यासाठी अँटीकोलिजन सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एलआयडीएआर सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट त्याच्यामध्ये असणाऱ्या ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकीकरणासाठी लागणारी वेळ स्वतःच निश्चित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशसन्स अँसिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० मापाची खोली अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची क्षमता आहे. यामध्ये वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबत इतर विषाणू व जिवाणूंचाही नायनाट करणे शक्य होणार आहे.
रोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. या रोबोटसाठी बनवलेल्या खास अशा अँड्रॉइड ॲपच्या मदतीने अगदी कुठूनही त्याला चालवणे शक्य आहे. मोबाइल वायफायद्वारे हा काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याहीपलीकडे जाऊन हा रोबोट आयओटी (Internet of Things) तंत्रज्ञानाद्वारे अगदी परदेशातूनही चालवता येतो. याव्यतिरिक्त त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे LED त्याची चालू स्थिती दर्शवतात तर जेव्हा तो UV-C tube चालू करून निर्जंतूकीकरणाचे काम सूरू करतो तेव्हा लाल रंगाचा LED लागतो.
रोबोटच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणची सर्व दृश्ये पाहणेही आपणास शक्य होईल. कोविड-१९ वॉर्ड, मोठमोठे माॅल, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ व प्रवाशी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किराणादुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी हा रोबोट अत्यंत लाभदायक ठरेल. या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यासोबत बोलूही शकतो आणि कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे, विद्युतचूंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहितीही देऊ शकतो.
विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने प्रा.डॉ.आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे, रत्नदीप कांबळे, पवन खोब्रागडे, समीर रामटेके आणि त्यांच्या संघाने ही संकल्पना सत्यात उतरवली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491