एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि अग्रीम देणार – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब
मुंबई, दि.9 : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांच्या थकित असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन व दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारा अग्रीम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. परब म्हणाले, हे तात्पुरते संकट आहे. लवकरच ते दूर होईल. आपल्या कुटुंबावर संकट येऊ देऊ नका. काळ जरी कठीण असला तरी, कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक अवाहनही परिवहनमंत्री श्री. परब यांनी केले .
श्री. परब म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या उर्वरित २ महिन्याच्या वेतनापैकीसुद्धा एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतनही कर्मचाऱ्यांना लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकित रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकित राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. कर्मचाऱ्यांचे वेतन व अनुषंगिक खर्चासंदर्भात मदतीसाठी शासनाकडे विनंती करण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. परब यांनी सांगितले.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491