आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड चार महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी वितरित- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि.३: राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २००० व ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे ५७.५६ कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे ७० हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491