आधारभूत खरेदी योजनेत मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून द्या – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर पालकमंत्र्यांकडून केंद्रीय खाद्य, सार्वजनिक वितरण मंत्र्यांसह विविध मान्यवरांना निवेदन
अमरावती, दि. 28 : आधारभूत खरेदी योजनेपासून जिल्ह्यातील मका पीक उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नये म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय रेल्वे तथा उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांना केली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या प्राप्त उद्दिष्टानुसार शेतक-यांच्या मका पीकाची खरेदी सुरू झालेली असताना उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यासह विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी बांधवांचा मका खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचा एक मोठा वर्ग यापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या परिस्थितीचा विचार करता मका पीकाचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी विनंती पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. गोयल यांना पत्रान्वये केली आहे.
केंद्रीय उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही पालकमंत्र्यांनी याबाबत निवेदन पाठविले आहे. राज्य शासनानेही केंद्र शासनाला विनंती करण्याबाबत पत्रही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठवले आहे.
कोरोना संकटकाळामुळे कृषी क्षेत्रात अनेक अडचणी आल्या. त्यासाठी शासनाकडून या काळात विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील धान्य उत्पादक शेतकरी बांधव आधारभूत खरेदी योजनेपासून वंचित राहू नयेत.
यासाठी उद्दिष्ट वाढवणे गरजेचे आहे. तरी उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे.