अहमद पटेल यांच्या निधनाने एका अभ्यासू, बुद्धिमान, परखड नेतृत्वास देश मुकला – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. 25 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पटेलजी यांच्या निधनाने पक्षासाठी एकनिष्ठ असलेला नेता गमावला असून एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धिमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना श्री. वडेट्टीवार म्हणाले, अहमद पटेलजींच्या निधनाने देशाचे न भरुन येणार नुकसान झाले आहे. अहमद पटेल यांनी देशाची अविरतपणे आणि निस्वार्थी हेतूने सेवा केली आहे. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षे घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यामुळे ते नेहमीच लक्षात राहतील. अहमदजी हे विद्वान राजकारणी होते. मृदुभाषी, व्यवहार चतुर आणि नेहमी हसतमुख राहणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. काँग्रेस पक्षासाठी त्यांनी केलेले काम अत्यंत प्रशंसनीय आहे. काँग्रेस पक्ष त्यांचे योगदान विसरू शकणार नाही.
काँग्रेसचे आधारवड अहमद पटेलजींच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही असे वडेट्टीवार म्हणाले. अहमदजी आज आपल्यात नसले तरी त्यांची वाणी, विचार नेहमीच प्रेरणा देत राहील, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.