अलिबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री सुनिल केदार
Summary
मुंबई, दि. 2 : अलिबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या अद्ययावत आणि आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. अलिबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अद्ययावत करण्याविषयी मंत्रालय येथे बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री […]
मुंबई, दि. 2 : अलिबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या अद्ययावत आणि आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
अलिबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अद्ययावत करण्याविषयी मंत्रालय येथे बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार उपस्थित होते.
श्री.केदार म्हणाले, अलिबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय हे कार्यालय रायगड जिल्ह्यातील शासकीय व स्थानिकस्तर संस्थांना सर्व प्रकारच्या लसमात्रा पुरविण्याचे व रोगनियंत्रणाच्या बाबींचे नियोजन करुन जिल्ह्यातील पशुसंवर्धनविषयक कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत आहे. यामुळे हे कार्यालय अद्ययावत असणे गरजेचे आहे. या कार्यालयाच्या नवीन उपक्रमांसाठी विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
पालकमंत्री कु.तटकरे यांनी जिल्ह्यातील पशुपालकांच्या गैरसोई टाळण्यासाठी प्रयोगशाळा अद्ययावत करणे, शल्यचिकित्सा विभागाचे बळकटीकरण आदी विषय मांडले.
इमारत दुरुस्ती आणि डागडुजी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. नवीन कामांकरिता विभागाकडे प्रस्ताव सादर करावे त्याकरिता निधी उपलब्ध करू, असे श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.